नरमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : प्रत्येकवर्षी दिवाळीत बॅँकांना कॅश टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यंदा मात्र आॅनलाईन बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंगमुळे कमालीचे कॅशलेस व्यवहार वाढल्याने व दिवसेंदिवस त्यात भर पडत असल्याने यंदाच्या दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत कॅशची टंचाई भासणार नाही, अशी माहिती बॅँक सूत्रांनी दिली. सध्या दसरा-दिवाळी सण तोंडावर असूनही बॅँकांच्या ट्रेझरीमध्ये अब्जावधी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
दिवाळी सणाच्या अगोदर बॅँकांमध्ये पैसे काढण्यासाठी भल्यामोठ्या रांगा लागत असतात. तुलनेत पैसे भरणाºयांची संख्या कमी असते. त्यामुळे बॅँकांमध्ये रोख रकमेची टंचाई होत असे. बॅँकांच्या ट्रेझरी मुंबईतील रिझर्व्ह बॅँकेच्या शाखेकडे मोठी कॅशची मागणी करतात; परंतु १०, २० कोटी रुपयांची जरी मागणी केली तरी रिझर्व्ह बॅँकेकडून तीन ते चार कोटी रुपयेच मिळायचे. त्यामुळे मोठ्या बॅँका लहान बॅँकांना त्यांच्या मागणीनुसार समाधानकारक रक्कम देऊ शकत नव्हत्या. ही आतापर्यंत दिवाळीतील स्थिती होती. यंदा मात्र अशी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे बॅँकांच्या वरिष्ठ अधिकाºयांचे मत आहे.
गतसाली नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार करावेत म्हणून बॅँकांनी आणि सरकारने जनजागृती केली. आजही कॅशलेस व्यवहाराची जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेषत: कॉलेज विद्यार्थी व तरुणाई आॅनलाईन बॅँकिंग, मोबाईल बॅँकांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. अनेक लहान-मोठ्या संस्था, कंपन्या यांनीही कॅशलेस व्यवहार करण्याचा धडाका लावला आहे. त्याचा परिणाम बॅँका, तसेच ट्रेझरीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात कॅश शिल्लक राहू लागली आहे.कोल्हापूर शहरात पाच बॅँकांच्या ट्रेझरी आहेत.प्रत्येक ट्रेझरीमध्ये शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम शिल्लक ठेवण्याची सुविधा आहे. दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर या ट्रेझरींकडून रिझर्व्ह बॅँकेकडे रोख रकमेची मागणी होत असते. यंदा मात्र अद्याप एकाही ट्रेझरीने रिझर्व्ह बॅँकेकडे मोठ्या रकमेची मागणी केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.पगार, बोनस आॅनलाईन जमायापूर्वी अनेक संस्था, कंपन्या, दिवाळीला आपल्या कर्मचाºयांना पगार, बोनस रोख रकमेतून देत होत्या; परंतु गेल्या काही वर्षांपासून रोख पगार, बोनस देण्याचे बंद झाले आहे. यंदा तर अपवाद वगळला, तर अनेक संस्था, कंपन्या आॅनलाईन बोनस जमा करणार आहेत.बॅँकांचा लाभांशही खात्यावर जमादिवाळी सणाच्या तोंडावर अनेक सहकारी बॅँका सभासदांना लाभांश रोख स्वरूपात वाटत होत्या. आता प्रत्येक सभादांचा लाभांश वार्षिक सभा झाल्यानंतर दुसºया दिवशी खात्यावर जमा होत आहे.