महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय कोविड टास्कफोर्सचे चेअरमन डॉ. संजय ओक असून सदस्यांमध्ये डॉ. शशांक जोशी, डॉ. झहिर उडवाडिया, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. नितीन कर्णिक, डॉ. झहीर विराणी, डॉ. बंजन, डॉ. प्रवीण बांगर, डॉ. तात्याराव लहाने या तज्ज्ञांचा समावेश आहे. या प्रोटोकॉलनुसार कोविड रुग्णांवर सर्व शासकीय, खासगी रुग्णालये, समर्पित कोविड सेंटर, समर्पित कोविड हेल्थ सेंटर, कोविड काळजी केंद्र येथे उपचार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मागदर्शक सूचनांनुसार या रुग्णांचे वर्गीकरण पाच गटांत करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये आढळणारी चिन्हे, लक्षणे यानुसार तत्काळ हे वर्गीकरण करून कोणते उपाय करावेत, याची सविस्तर उपचार प्रणाली ठरविण्यासाठी या प्रोटोकॉलचा डॉक्टरांना निश्चित फायदा होणार आहे.
रेमडेसिविर, टॉक्सीलिझुम्ब यासह अन्य इंजेक्शन्सचा वापर कोणती लक्षणे असल्यास करावा, डोस मात्रा, दुष्परिणाम, रुग्णांवर देखरेख याबाबत तज्ज्ञ समिती गटाव्दारे सविस्तर मागदर्शन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ मुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत तसेच हे प्रोटोकॉल आपल्या रुग्णांलयातील आय.सी.यू. वार्ड, नर्सिंग स्टेशन, जनरल वाॅर्डच्या ठिकाणी दर्शनीभागात लावावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी केले आहे.