लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आजकाल फायब्रॉइडच्या गाठी असल्यामुळे गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो; परंतु पिशवी न काढताही फायरब्रॉइडवर मेडिकल थेरपीद्वारे उपचार करता येतात आणि ही सुविधा येथील प्रिस्टिन वुमेन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. सचिन कुलकर्णी व डॉ. अजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
फायब्रॉइड व एन्डोमेट्रिसओसिस हे वयात आलेल्या स्त्रियांना म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षापासून ते ५० व्या वर्षापर्यंतच्या स्त्रियांना त्रास देणारे आजार आहेत. हे खूप कॉमन आजार असून वयाच्या तिशीनंतर तर त्याचे प्रमाण जास्त आहे. पोटात दुखणे, गर्भपात होणे यासारखा त्रास होतो. बऱ्याचवेळा काही डॉक्टर गर्भाशयाच्या पिशवीला फायब्रॉइडच्या गाठी झाल्या असल्याने पिशवी काढावी लागेल, असा सल्ला देतात. वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षादरम्यान जर एखाद्या स्त्रीला असा सल्ला दिला तर वंध्यत्व येते; परंतु गर्भाशयाची पिशवी न काढताही थ्री डी एन्डोस्कोपीद्वारे फायब्रॉइड गाठी काढता येतात, तर एक दोन गाठी असल्यास त्यावर मेडिकल थेरपीद्वारे चार महिन्यांचे उपचार केले जातात.
एन्डोमेट्रीसओसिस हा आजार गंभीर असून मासिक पाळीच्या वेळचे रक्त गर्भनलिकेतून पोटात जाते. तेथेच ते साचून राहते व पोटात दुखण्याचा त्रास सुरू होतो. अन्य अवयव चिकटल्यामुळे शरीराची रचना बदलते; परंतु तेही आता वैद्यकीय उपचारांनी बरे करणे शक्य झाले असल्याचे सांगण्यात आले.
प्रिस्टिन वुमेन्स हॉस्पिटलमध्ये या दोन्ही आजारांवर अचूक मार्गदर्शन व उपचार केले जात असून डॉ. कुलकर्णी, डॉ. पाटील यांच्यासह डॉ. प्रिया जैन, डॉ. शरयू मोहिते गरजू रुग्णांना सुविधा देत आहेत.