कोल्हापूर: पोस्ट कोविड म्हणून पुढे आलेल्या म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारही आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत होणार आहेत. मंगळवारी हा शासन आदेश जारी झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेतंर्गत लाभ घेता येणार आहे.
कोरोनावरील उपचार सुरु असतानाच म्युकरमायकोसिस या नव्याच बुरशीजन्य आजाराने वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान उभे केले आहे. याचे उपचारही महागडे असल्याने सर्वसामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक गलितगात्र झाले होते. याचा विचार करुन राज्य सरकारने तातडीने जनआरोग्य योजनेतच याचा समावेश केल्याची घोषणा करुन मार्गदर्शक सूचनाही प्रधान सचिव एम. नीलिमा केरकेट्टा यांच्या सहीने जारी केल्या आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचेही उपचार होणार आहे. यात सर्जिकलचे ११ व मेडिकलचे ८ पॅकेज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णाने कोरोनासह अन्य आजारासाठी या योजनेतून उपचार घेतला असला तरी देखील म्युकरमायकोसिससाठीचे उपचार या योजनेतून करावयाचे आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट ०१
राज्य आरोग्य हमी सोसायटीवर जबाबदारी
दिलेल्या विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च झाल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागवण्यात येणार आहे. या आजारात महागडी औषधे वापरली जातात. ती उपलब्ध करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची असणार आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर अतिरिक्त खर्चाच्या नियोजनाची जबाबदारी असणार आहे. या कमिटीकडेच अंगीकृत रुग्णालयाचे दावे व खर्चाची प्रतिपूर्ती करता येणार आहे.