कोल्हापूर : सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने रविवारी जिल्ह्याला झोडपून काढले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी सकाळी ११ वाजता पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, पंचगंगेसह भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, वारणा या प्रमुख नद्या पुराच्या दिशेने वाहू लागल्या आहेत. त्यावरील १८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद झाली आहे. दरम्यान, दुपारी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरून पन्हाळा, जोतिबा, मलकापूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेल्या पर्जन्यमापकावरील नोंदीनुसार ४४.७६ च्या सरासरीने ५३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गगनबावड्यात तब्बल १२३ मिलिमीटर इतका या वर्षीच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. आजरा, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळ्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.वाहतूक ठप्पसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊ लागली असून, कोयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत जवळपास पाच टीएमसीने वाढ झाली आहे. तर सततच्या या पावसामुळे पश्चिमेकडील अनेक रस्त्यावर दरड व झाडे कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. शनिवारी सकाळपासून पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोयना धरण परिसरात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ३११ मिलिमीटर पाऊस झाला.मुंबई-गोवा महामार्ग खुलाखेड (जि.रत्नागिरी) : पावसाचा जोर ओसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरुन सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली.तब्बल पाच तास महामार्ग बंद असल्याने मध्यरात्रीपासून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.
कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर झाड कोसळले; पंचगंगा पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:38 PM