प्रवीण देसाई ।कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत आपल्या संसाराला हातभार लावला आहे. त्यांच्याबद्दल कुतूहलाची व आदराची भावनाही येथे ग्राहक म्हणून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर दिसून येते.पानटपरीचा व्यवसाय व्यसनाशी निगडित असल्याने याठिकाणी प्रत्येक थरातील लोक येतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस अंगी असल्याने सुमन मावशींना ही जबाबदारी तशी फारशी अवघड वाटली नाही. त्यांनी आपले मार्गक्रमण अखंडपणे सुरू ठेवले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे जन्मलेल्या सुमन मावशींचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. त्यांचा विवाह कोल्हापुरातील आनंद बुढ्ढे यांच्याशी झाला.सासरे तसेच कुटुंबीय मनमिळावू परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक पर्याय हा गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी निव्वळ व्यवहारज्ञानाच्या जोरावर घरगुती शाकाहारी खानावळ सुरू केली. त्यासोबत भडंग विकणे, घरोघरी फिरून गृहोपयोगी वस्तंूची विक्री करणे, परिसरातील मुलांना शाळेत सोडणे व आणणे अशी विविध प्रकारची कामे केली. त्यातून त्यांनी संसाराचा आर्थिक गाडा सुरळीत केला. त्यांची मुले शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली व त्यांचे संसारही उभे राहिले. त्यामुळे मुलांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला; परंतु अंगातील कष्टाची सवय मावशींना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सासºयांचा पानटपरीचा पारंपरिक व्यवसाय हाती घेतला. सासºयांनी तो १९७० साली सुरु केला होता. सध्या घरातील सर्व कामे आवरून पानटपरीमध्ये दिवसातील किमान सहा ते आठ तास व्यस्त असतात. कधी-कधी त्यांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते; परंतु आपला अनुभव व हजरजबाबीपणा या दोन अंगभूत गुणांच्या जोरावर या अनुभवांना धीरोदात्तपणे त्या सामोरे गेल्या. त्यांना त्यांचे दिरही या कामी मदत करतात. या अंगभूत गुणांच्या जोरावर एक महिला पानपट्टीसारखा व्यवसायही अत्यंत कुशलतेने करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.घामावर विश्वाससुमनमावशींनी आयुष्यात कधीही लॉटरीचे तिकीट काढले नाही; कारण घामाचा पैसा हाच जीवनात सार्थकी लागतो; त्यामुळे कष्टाची साथ कधीच सोडायची नाही, असा दृढनिश्चय करून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.शारीरिक कष्ट कुठे वाया जात नाहीत. देवाने मनुष्याला चांगले शरीर व बुद्धी दिलेली आहे. हीच एक संधी समजून काम करीत राहावे; म्हणजे त्याचे फळ आपोआपच चांगले मिळते. - सुमन बुढ्ढे
पानटपरीतही तार्इंचे सु‘मन’ रमले! जिद्दीने व्यवसाय : संसाराला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:24 AM