Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:02 PM2023-05-05T12:02:22+5:302023-05-05T12:02:39+5:30
२४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार राज्य शासनाने दिले होते. लेखापरीक्षण थांबवावे, यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चाचणी लेखापरीक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले. हा सत्ताधाऱ्यांना धक्का मानला जात आहे.
गोकुळ दूध संघाचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी संचालिका महाडिक यांनी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे केली होती. त्यानुसार मंडळाने गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. मसुगडे लेखापरीक्षण करीत आहेत. २४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे. मात्र, या मुद्यावरून संचालिका महाडिक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. सत्ताधारी याविरोधात न्यायालयात गेले आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे.
सुनावणीत गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुढील सुनावणीसाठी ८ जूनला होणार आहे. न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी असल्याने याबाबतच्या सुनावणीसाठी १ महिन्यानंतरची तारीख देण्यात आली आहे. तोपर्यंत पुढील कार्यवाहीसंदर्भात निर्देश देऊ नयेत, अशा सूचना शासनास दिलेल्या आहेत. गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेवून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.