गडहिंग्लज : ताबा सुटल्याने दुचाकी नगरपालिकेच्या संरक्षक कठड्याला धडकून झालेल्या अपघातात अभियंता तरूणाचा जागीच मृत्यू झाला.मित्राच्या नवीन दुचाकीची ट्रायल घेत असताना शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. ऋषिकेश उमेश पोतदार (वय २५ रा. बुरूड गल्ली, गडहिंग्लज) या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, ऋषिकेश हा शुक्रवारी रात्री मित्रासमवेत गल्लीत गप्पा मारत थांबला होता.त्यावेळी त्याचा मित्र संग्राम पाटील आपली नवीन मोटारसायकल केटीएम ड्युक( एमएच ०९ इव्ही २१४६) घेऊन तिथे आला.त्यावेळी ऋषिकेशचा भाऊ अभिषेकने पहिल्यांदा नव्या गाडीची ट्रायल घेतली.त्यानंतर ऋषिकेश ट्रायल घेण्यासाठी गाडी घेऊन निघाला.दरम्यान,शहरातील मुख्य रस्त्यावरून भरधाव जात असताना नगरपालीकेजवळ आला असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला.त्यामुळे रस्त्याकडेला थांबलेल्या एका दुचाकीला धडक देवून त्याची गाडी पालिकेच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळली.त्यात गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी ऋषिकेशच्या आई मामाकडे कोरेगावला गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी अभिषेक व ऋषिकेश दोघेही रविवारी (२५) कोरेगावला जाणार होते. ऋषिकेशच्या अपघाताची माहिती मिळताच त्या शनिवारी पहाटे गडहिंग्लजला आल्या.परंतु,येथे आल्यानंतर त्यांना अपघातात ऋषिकेशचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
ऋषिकेशच्या पश्चात आई, भाऊ, चुलते, चुलती, तीन चुलत बहिणी असा परिवार आहे.संग्राम पाटील यांच्या वर्दीवरून पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.पोलीस हेडक्वॉन्स्टेबल एस.व्ही.पाटील अधिक तपास करत आहेत.
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरसंगणकशास्त्राची पदविका घेतलेला ऋषिकेश गेल्या वर्षीपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. लॉकडाऊनमुळे तो गावी गडहिंग्लजला आला होता. त्याच्या अकाली जाण्यामुळे पोतदार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दुचाकीच ठरली काळ!ऋषिकेशचे वडील उमेश हेदेखील काही वर्षांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते.उचारादरम्यान त्यांचेही निधन झाले.दरम्यान, दुचाकीच्या अपघातातच काळाने तरूण मुलगा हिरावून नेला, त्यामुळे ऋषिकेशच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे.