सुनील चौगले ल्ल आमजाई व्हरवडेपरिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. सध्या राजकीय घडामोडी पाहता दोन्ही कॉँग्रेसच्या विरोधात माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले आघाडीच्या तयारीत असल्याने ‘भोगावती’ला तिरंगी लढतीचे संकेत आहेत.गत निवडणुकीत राष्ट्रवादीने मित्रपक्षांना बरोबर घेऊन कॉँग्रेसची वीस वर्षांची सत्ता संपुष्टात आणून प्रथमच ‘भोगावती’वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. गेल्या आठ-दहा वर्षांपासून येथील राजकारण्यांच्या चुकीच्या निर्णयाने कारखाना आर्थिक संकटात आला आहे. ५२ गावांचे कार्यक्षेत्र तसेच करवीर व राधानगरी तालुक्यातील ३० हजार सभासदांनी मोठ्या अपेक्षेने ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात सत्ता दिली, पण संचालक मंडळाकडून कारखाना ऊर्जितावस्थेत येण्याची आशा असताना गेल्या दहा वर्षांत तो आणखीनच आर्थिक गाळात रूतला. कारखान्यावर दोनशे कोटींपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर असल्याचा आरोप होत आहे. संचालकांनी केलेली नोकरभरती राष्ट्रवादीला अडचण निर्माण करत आहे. निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचे पॅनेल करताना ए. वाय. पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. यंदा ते शेकाप, जनता दल, शिवसेना यांना घेऊनच विरोधकांना तगडे आव्हान देणार हे निश्चित !कॉँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी करताना कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील सावध पावले उचलत आहेत. ते पॅनेलमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. भोगावती शिक्षण मंडळातील गेल्या पाच-सहा वर्षांपासूनच्या कारभाराने खुद्द नेतेच नाराज आहेत. त्यामुळे ते स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. सध्या कॉँग्रेसकडे उदयसिंह पाटील (कौलवकर) यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे. त्यांच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीमुळे पी. एन. पाटील यांना सत्ता मिळविणे सोपे होेणार आहे. सध्या कॉँग्रेसकडे उमेदवारी देताना पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. वर्षभरापासून माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मेळावे घेऊन भूमिका स्पष्ट केली. आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानून ते तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आहेत. राष्ट्रवादीने कारखान्यात, तर कॉँग्रेसने शिक्षण मंडळात केलेला कारभार ते सभासदांसमोर आणणार आहेत. आज दोन्ही कॉँग्रेससह अनेक पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. सतेज पाटील यांनी मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, भाजपमध्ये अजून शांतताच आहे. ते कोणाबरोबर जाणार की स्वतंत्र आघाडी करणार हे लवकरच स्पष्ट होईल. ‘ए . वाय.’चा करिश्मा पुन्हा चालणार ?मागील सत्ता ही ए. वाय. पाटील यांच्या मुरब्बी राजकारणानेच राष्ट्रवादीला मिळाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या व मित्रपक्षांच्या काही संचालकांनी केलेला अनागोंदी कारभार, पुत्रप्रेमाने पछाडलेल्यांनी पात्रता नसताना पुत्रांना दिलेले प्रमोशन राष्ट्रवादी आघाडीला घातक ठरणार आहे. त्यामुळे अशा संचालकांना घरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर ए. वाय. पाटील पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळविण्याचा करिश्मा करू शकतील हे निश्चित !नेतृत्व उदयसिंह पाटील यांच्याकडेकॉँग्रेसने सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. स्वच्छ प्रतिमा असणारे उदयसिंह पाटील (कौलवकर) यांच्याकडे भोगावतीचे नेतृत्व देण्याचा विचार खुद्द पी. एन. पाटीलच करत असल्याने भोगावतीला स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाचे संकेत आहेत. आज कौलवकरच कॉँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणार.
‘भोगावती’त तिरंगी लढत शक्य
By admin | Published: January 09, 2017 12:58 AM