कोल्हापूर : समाजाच्या पुरोगामी चळवळीत पुरुषांचे प्रमाणही नगण्य असताना, एक स्त्री असूनही पुरोगामी चळवळ आणि साहित्यविश्वाला एक नवी ‘आशा’ दाखविणाऱ्या आशा आपराद यांच्या निधनाने पुरोगामी चळवळ आणि साहित्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना विविध मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.शाहू स्मारक भवन येथे ‘ग्रंथ कॉर्नर’ व ‘वाचनकट्टा’तर्फे मुस्लिम समाजाच्या चळवळीतील कार्यकर्त्या व ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दलितमित्र व्यंकाप्पा भोसले म्हणाले, कोल्हापुरातील सामाजिक आणि साहित्यजीवनात मुस्लिम स्त्री असूनसुद्धा त्यांनी अनेक संस्थांना योगदान दिले, साहित्य क्षेत्रात उज्ज्वल काम केले. महिला दक्षता समिती, मुस्लिम सत्यसोधक या संस्थांमध्ये त्यांनी अनेक प्रकारे भरीव योगदान दिले आहे.अनिल मेहता म्हणाले, साहित्यक्षेत्रात एक मुस्लिम महिला आत्मचरित्र लिहिते. त्यामध्ये वास्तव जगणे मांडते; त्यामुळेच त्यांच्या आत्मचरित्रांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण म्हणाले, साहित्यनिर्मितीमध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे. फक्त मुस्लिम समाजासाठी नाही, तर वंचित व उपेक्षित घटकांसाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे.प्रा. मानसी दिवेकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याच्या कामासह स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. बहुजन समाजातील अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांनी त्यांचे जीवन घडविले आहे.सी. एम. गायकवाड म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये त्यांचे काम आहेच. त्या संस्था उभ्या करण्यात त्यांचे मौलिक मार्गदर्शन राहिले आहे. याप्रसंगी काका विधाते, प्रा. डॉ. भालबा विभूते, डॉ. पांडुरंग पाटील, कृष्णात स्वाती, नियाज अत्तार, प्रा. सुभाष देसाई, हसन देसाई, लेखक प्रतीक पाटील, प्रसाद बुरांडे, एम. डी. देसाई, ई. डी. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.