हजारो महिला, तरुणांचा सहभाग
मुरगूड -
सात वर्षांच्या निष्पाप वरद रवींद्र पाटील यांची अमानुष हत्या करण्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत सोनाळी, ता. कागल येथील शेकडो ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून मृत वरदला श्रद्धांजली वाहिली. गावातील प्रमुख रस्त्यावर हजारो महिला, तरुण ग्रामस्थ हातामध्ये मेणबत्त्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. तीव्र संतप्त, भावना व्यक्त करत या भ्याड कृत्याचा निषेध अनेकांनी केला. निषेध सभेने मोर्चाची सांगता झाली.
हसऱ्या, देखण्या राजबिंडा वरदची हत्या सोनाळीकर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला हतबल करून गेली आहे. वरदचे अपहरण झाल्यापासून सोनाळीकर ग्रामस्थ कमालीचे अस्वस्थ आहेत. वरदचा खून झाला हे निष्पन्न झाल्यानंतर दाबून ठेवलेल्या भावनांना गावकऱ्यांनी अश्रूंना वाट करून दिली होती. आज तिसऱ्या दिवशीही गावात अस्वस्थता दिसत होती. गल्ली गल्लीत तरुण, ग्रामस्थ गटागटाने चर्चा करताना दिसत होते, तर वरदच्या घरी तर अनेकांची रेलचेल होती. त्यातून अनेकांचे हुंदके मनाला अस्वस्थ करत होते. या भ्याड कृत्याचा निषेध करण्यासाठी तरुणांनी दुपारी कँडल मार्च काढण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सायंकाळी सातच्या दरम्यान ग्रामस्थ तरुण महिला एकत्र येऊ लागल्या. हातामध्ये पेटत्या मेणबत्या घेऊन कँडल मार्चची सुरुवात सोनाळी- पिराचीवाडी मुख्य मार्गावरून झाली, त्यानंतर चौगले गल्ली, चावडी गल्ली, भोसले -वैद्य गल्ली येथून नागनाथ मंदिरापासून शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कँडल मार्च आला. या संपूर्ण मार्गावर प्रचंड घोषणाबाजी झाली. नराधमाला फाशी झालीच पाहिजे, वरद बाळ कोणाचा वरद बाळ गावाचा, वरदला न्याय मिळालाच पाहिजे, मारुती वैद्यला फाशी द्या, भ्याड कृत्याचा निषेध असो, बघता काय सामील व्हा अशा घोषणा देत आणि संशयित आरोपी मारुती वैद्य याला शिव्या घालत हा मार्च ग्रामपंचायत कार्यलयाजवळ आला.
या ठिकाणी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत आरोपीचा छडा लावल्याबद्दल मुरगुड पोलिसांचे आभार ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे यांनी मानले व आरोपी नराधामला फाशीची शिक्षा होईपर्यंत गावकऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून एकजूट दाखवत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही म्हातुगडे यांनी केले. याशिवाय उदय तापेकर, संभाजी कुलकर्णी, किरण भिऊगडे, समाधान तापेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कँडल मार्चमध्ये गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :- सोनाळी, ता. कागल येथील वरद पाटील या चिमुकल्याच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांनी कँडल मार्च काढला.