कोल्हापूर/ शिरोली : ‘महिन्याला दोन हजार रुपये हप्ता द्यायचाच’, अशी दमदाटी केल्यामुळे सदरबाजार येथील अॅपेरिक्षा चालकाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आज, सोमवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अंजूम अस्लम पठाण (वय २६, रा. सदरबाजार मशिदीजवळ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सीपीआर आवारात रिक्षाचालकांसह मित्र परिवारांनी एकच गर्दी केली होती.याबाबत पठाण यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी, गेल्या पाच वर्षांपासून अंजूम पठाण हा लुगडी ओळ ते शिरोली या मार्गावर रिक्षा व्यवसाय करतो. आज तो नेहमीप्रमाणे अॅपे रिक्षा (एम एच ०९ - जे - ५८४३) घेऊन शिरोलीकडे जात होता. सकाळी येथील एचएमटी फाटा स्थानकावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलनी पठाण याला अडविले. ‘महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता’ द्यावयाचा तरच व्यवसाय करायचा, असे सांगितले. त्यावेळी ‘आज काय व्यवसाय झालेला नाही आणि महिन्याला दोन हजार रुपये कसा हप्ता द्यावयाचा’, असा प्रश्न पठाणने पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी ही रिक्षा पोलीस ठाण्याच्या दारात आणून त्याच्यावर कारवाई केली. कारवाईनंतर अंजुमने पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी विष प्राशन केले. या प्रकारामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. हा प्रकार समजताच शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. पी. यादव सीपीआर रुग्णालयामध्ये आले. पठाणवर रुग्णालयात उपचार सुरु होते. (प्रतिनिधी)दोन वर्षांपूर्वीची आठवणदोन वर्षांपूर्वी शिये (ता. करवीर) येथील हनुमाननगर परिसरातील रिक्षाचालकाने पोलिसाने हप्ता मागितला म्हणून आत्महत्या केली होती, अशी चर्चा यावेळी सीपीआर आवारात नागरिकांमधून सुरू होती. पठाणकडे ज्या पोलिसाने हप्ता मागितला त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक यावेळी करत होते.
हप्त्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: January 06, 2015 1:01 AM