कोल्हापूर : आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा साजरी करण्यासाठी तीन शुक्रवार आणि दोन मंगळवार मिळणार आहेत. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने कोणत्याही यात्रा, जत्रांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट केल्याने वाद्य, मिरवणुकांऐवजी ही यात्रा वैयक्तिक पातळीवर साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे.आषाढ महिन्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात पंचगंगेला आलेले नवे पाणी त्र्यंबोली देवीला वाहिले जाते. गल्लोगल्ली व पेठापेठांमधून भागाभागांमधून मंडळांतर्फे या यात्रेचे नियोजन केले जाते. त्यासाठी वर्गणी घेतली जाते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात जथ्थ्याने या मिरवणुका त्र्यंबोलीच्या दिशेने जातात.
यंदा मात्र सगळ्याच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने जत्रा, यात्रा व उत्सवांवर बंदी आणली आहे, शिवाय सगळी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. या पार्श्वभूमीवर त्र्यंबोली यात्रा कशी साजरी करायची याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे.आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या शुक्रवारी व मंगळवारी ही यात्रा साजरी केली जाते. यंदा एकादशी १ जुलै रोजी असून, त्यादिवशी बुधवार आहे. त्यानंतर येणारा शुक्रवार (दि. ३, दि. १० आणि दि. १७), मंगळवार (दि. ७ आणि दि. १४) असे पाच दिवस त्र्यंबोली यात्रेसाठी मिळतात.प्रशासनाने संभ्रम दूर करावात्र्यंबोली ही रक्षक देवता असल्याने पूर्वीपासून ही यात्रा आर्मी तसेच पोलीस मुख्यालयाकडूनही साजरी केली जाते. दोन्ही सुरक्षा यंत्रणांकडून देवीला सलामी दिली जाते. सध्या सगळी मंदिरे बंद आहेत. मंदिरे खुली होणार की नाही हे ३० जूननंतर समजेल. हा सगळा संभ्रम दूर होण्यासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने याबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.