कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच त्र्यंबोली देवीची यात्रा भाविकांविना शांततेत पार पडली. अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर निधी गुरव या बालिकेच्या हस्ते कोहळा छेदन विधी झाला. यंदा यात्रेला भाविकांची गर्दी नसली तरी कोहळा मिळवण्यासाठीच्या धडपडीत पोलिसच आघाडीवर होते. त्यामुळे काहीवेळ झटापट झाली.अंबाबाईचे कोल्हासुराचा वध केल्यानंतर झालेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले, त्यामुळे आपल्या रुसलेल्या सखीला भेटण्यासाठी अंबाबाई जाते व कोल्हासुराचा वध कसा केला हे कोहळा छेदनातून दाखवते. यंदा यात्रांना परवानगी नसल्याने गर्दी टाळण्यासाठी अंबाबाईची पालखी सजवलेल्या वाहनातून नेण्यात आली. तत्पूर्वी सकाळी साडे नऊ वाजता तोफेची सलामी झाल्यानंतर देवीची पालखी पूर्व दरवाज्यातून मंदिराबाहेर आली.
भवानी मंडपापर्यंत पायघड्यांवरुन आल्यानंतर येथे जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून पूजा करण्यात आली. यानंतर पालखी सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आली. येथे भाविकांनी अंबा माता की जय चा गजर करत फुलांचा वर्षाव केला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात वाहन निघाले. बिंदू चौक, उमा टॉकीजमार्गे शाहु मिल चौकात आणि टाकाळा चौकात परंपरेप्रमाणे पालखीचे पुजन झाले. सव्वा बाराच्या दरम्यान पालखी त्र्यंबोलीवर पोहोचली. त्याआधीच तुळजाभवानी देवीच्या पालखीचे आगमन झाले होते.अंबाबाई व तुळजाभवानीची भेट झाल्यानंतर आरती करण्यात आली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिका निधी श्रीकांत गुरव हिचे पूजन झाले. यावेळी शहाजीराजे, यशराजराजे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य राजू जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार. मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव तसेच मानकरी उपस्थित होते.