कोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनल्स येथे तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या दोघा भावांना बेड्या ठोकून अमानुषपणे बेदम मारहाण केल्याप्रकरणी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिवाजी पाटील (वय २७, रा. कुंडलवाडी, जि. सांगली) व तिकीट तपासनिस आर. के. विश्वकर्मा (रा. छिंदवाड-मध्यप्रदेश), आबासाहेब मदणे (रा. सांगोला, जि. सोलापूर), कृष्णा फिरंगे (रा. कोल्हापूर) हे चौकशीमध्ये दोषी आढळून आले आहेत. या सर्वांच्या विरोधात निलंबनाचा प्रस्ताव पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे, अशी माहिती मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, मिरजेहून आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अब्दुल जमादार, चंद्रकांत घुटकुडे यांच्यासह रेल्वे स्टेशन मास्तर सुग्रीव मीणा, अॅड. रमेश बदी यांची घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी तिकीट तपासनिस (टीसी) आर. के. विश्वकर्मा यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याची खंत खुद्द पोलिसांनीच यावेळी व्यक्त केली. शाहू टर्मिनल्स येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास निजामउद्दीन एक्स्प्रेस स्टेशनवर आली. यावेळी प्रवेशद्वारासमोर बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकडे तिकीट तपासनिस विश्वकर्मा यांनी प्रदीप आनंदा राजे (वय ३२) व दीपक आनंदा राजे (३०, दोघे रा. शुक्रवार पेठ) यांच्याकडे तिकिटाची विचारणा केली. यावेळी ते पळून जावू लागल्याने तिकीट तपासनिस आबासाहेब मदने व कृष्णा फिरंगे यांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांनी आम्ही नातेवाईकांची पार्सल देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले परंतु तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. फिरंगे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याने ते दोघे तरुण संतापले आणि त्यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी बंदोबस्तास असणारे रेल्वे पोलीस जयंत पाटील यांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये बेड्या घालून बेदम चोप दिला. त्यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणाची माहिती समजताच मिरज लोहमार्गचे पोलीस निरीक्षक भिंगारदेवे, पोलीस उपनिरीक्षक जमादार यांनी कोल्हापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली. बुधवारी दिवसभर या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी फक्त तिकीट तपासनिस विश्वकर्मा एकटाच उपस्थित होता अन्य दोघेजण गायब होते.पाच रुपयांच्या तिकीटासाठी दोघा भावांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. त्या दोघांना दंड करण्याऐवजी त्यांना बेड्या ठोकून मारहाण केल्याने हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर फौजदारी दाखल करणार आहे. - अॅड. रमेश बदी, कोल्हापूर
कॉन्स्टेबलसह तिघे तिकीट तपासनिस दोषी
By admin | Published: March 19, 2015 12:20 AM