कोल्हापूर : एसटी, छोटा हत्ती टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुण प्रशांत संभाजी कांबळे (वय २३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हा एसटीच्या मागील चाकाखाली सापडला. सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील ओंकार बाबासाहेब समुद्रे (वय २४) आणि गणेश देवदास समुद्रे (वय २४, दोघेही रा. शिरोली पुलाची) हे किरकोळ जखमी झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी (दि. २६) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातस्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा सोमवारी दुपारी त्याच्या दुचाकीवरून दोन मित्रांसह टोप (ता. हातकणंगले) गावात गेला होता. तेथून परत शिरोलीला येताना शिये फाटा येथे धनराज हॉटेलजवळ समोरच्या छोटा हत्ती टेम्पोच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यावेळी प्रशांतने दुचाकीचा ब्रेक लावल्याने दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. त्याचवेळी बाजूने कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या मागील चाकाखाली प्रशांत सापडला. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्याचे दोन्ही मित्र विरुद्ध दिशेला पडल्याने सुदैवाने बचावले. अपघातानंतर जखमी प्रशांतला १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशांत याच्या पश्चात आई, वडील आणि पाच विवाहित बहिणी आहेत. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.कुटुंबीयांचा आक्रोशप्रशांत शिरोलीत फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे, तर वडील खासगी कंपनीत काम करतात. अपघाताची माहिती मिळताच प्रशांतचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
Kolhapur: तिहेरी अपघातात तरुण ठार; टेम्पो चालकाने अचानक ब्रेक मारला, दुचाकीस्वार घसरून एसटीच्या चाकाखाली सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 2:31 PM