कोल्हापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटानजीक रस्त्याकडेला पेट्रोल पंपच्या आवारात पार्किंग केलेला ट्रक शॉर्ट सर्किटने पेटल्याची घटना घडली. शेजारी पेट्रोल पंप असल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत ट्रकचे जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगली फाटानजीक एका पेट्रोल पंपाच्या आवारात हिम्मत बाळासाहेब सर्जेखान (रा. पुलाची शिरोली) यांनी आपल्या मालकीचा ट्रक उभा केला होता. सोमवारी मध्यरात्री या ट्रकला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत ट्रकची केबीन जळून खाक झाली. पेट्रोल पंप आवारातच आगीची घटना घडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. महापालिकेच्या ताराराणी फायर स्टेशनमधील अधिकारी दस्तगीर मुल्ला, आकाश जाधव, अवधूत चव्हाण, अजित शिनगारे हे वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.