गांधीनगर : भंगारातील ट्रकचे लोखंड काढताना गॅस कटरची ठिणगी डिझेल टाकीवर पडून स्फोट झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील गोसावी गल्लीत घडली. विद्यानंद रामजीत प्रजापती (वय ४६ वर्षे, सध्या रा. मणेर मळा, उंचगाव, ता. करवीर, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि रोहित रवींद्र गोसावी (वय १९ वर्षे, रा. गोसावी गल्ली, गडमुडशिंगी) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गडमुडशिंगीतील रवींद्र राऊ गोसावी यांनी भंगारात आलेला ट्रक स्क्रॅप करण्यासाठी आणला होता. त्याचे वेगवेगळे स्पेअर पार्ट काढण्याचे काम रोहित गोसावी व त्यांचा कामगार विद्यानंद प्रजापती हे दोघे करीत होते. रोहित याने सकाळीच ट्रकच्या टाकीतील डिझेल काढले होते. त्यानंतरही काही डिझेल टाकीत शिल्लक होते. तसेच टाकीच्या पाइपचे तोंड बंद करायचे राहून गेले होते. दरम्यान, गॅस कटरच्या मदतीने ट्रकचे हूड काढण्याचे कम सुरू होते. कटरची ठिणगी डिझेल पाइपवर पडल्याने टाकीने पेट घेतला. काही क्षणातच टाकीचा स्फोट झाला. यावेळी टाकीजवळ उभे राहून काम करणारा कामगार भाजून गंभीर जखमी झाला. काही अंतरावरील रोहितही आगीत भाजून जखमी झाला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.स्फोटाने गल्ली हादरलीट्रक स्क्रॅप करताना झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. आवाज ऐकून शेजारच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजलेले कामगार आकांताने सैरभैर पळत होते. काही नागरिकांनी कामगारांच्या कपड्यांची आग विझवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.
नागरिकांना धोका
गडमुडशिंगीत भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवणारी कुटुंबे आहेत. भरवस्तीत यांनी भंगाराचे साहित्य ठेवले असून, त्यात ज्वलनशील पदार्थ, वस्तू असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो.