कोल्हापूर : ट्रकमधून कृषी केंद्रावर पाठवलेली सुमारे चार लाख १३ हजार ९३० रुपये किंमतीची ४०० खतांची पोती पोहोच न करता त्याचा परस्पर अपहार करून मार्केट यार्डमधील श्री साई समर्थ ट्रान्स्पोर्ट कंपनीची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नटराज रामहरी दास (वय ३२, रा. इकुरा, ता. कैज, जि. बीड) या ट्रकचालकावर सोमवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला. ट्रकचालकाने खतांची पोती गायब करून रिकामा ट्रक सांगली येथील गाडीअड्डा येथे सोडून दिल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेबवडे (ता. करवीर) येथील अक्षय कृष्णात जाधव यांच्या मालकीचा ट्रक असून या ट्रकवर नटराज दास हा चालक म्हणून काम करतो. या ट्रकमध्ये श्री साई समर्थ ट्रान्स्पोर्ट (रेल्वे धक्का, मार्केट यार्ड, कोल्हापूर)मधून सुमारे चार लाख १३ हजार ९३० रुपये किमतीची इफको १०:२६:२६ या कंपनीच्या खतांची ४०० खतांची पोती भरण्यात आली. ही पोती लक्ष्मी नारायण कृषी सेवा केंद्र, जांभळी खोडा गुडाळ (ता. राधानगरी), श्री गुडेश्वर ग्राहक संस्था गुडाळ (ता. राधानगरी) या संस्थेत पोहोच करण्याची जबाबदारी ट्रकचालकावर सोपवली होती. शनिवारी (दि. १३) हा ट्रक खतांची पोती भरून बाहेर पडला. पण तो कृषी केंद्रावर पोहोचलाच नाही. हा ट्रक सांगली गाडीअड्डा येथे रिकामा बेवारस स्थितीत मिळाला. या ट्रकमधील माल चालक नटराज दास याने परस्पर अपहार करून त्याने ट्रकमालक जाधव व ट्रान्स्पोर्ट कंपनीची फसवणूक केली. याबाबत त्याच्यावर सोमवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.