उद्धव गोडसे
कोल्हापूर : ओरोस (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पडकून त्यातील ४८ लाख रुपयांची दारू आणि साडेबारा लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्तांच्या भरारी पथकाने आज, गुरुवारी (दि.१२) सकाळी ही कारवाई केली. ट्रक चालक हासीम कासम शेख (वय ६१, रा. सांताक्रुझ पूर्व, मुंबई) याला पथकाने ताब्यात घेतले आहे.राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित ट्रक (एम.एच. १२ आर.एन. ४४०३) थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे एक हजार बॉक्स आढळले. पथकाने ४८ लाख रुपयांची दारू आणि १२ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक जप्त केला.ट्रकचालक हासीम शेख याला ताब्यात घेतले असून, गोवा बनावटीचा मद्यसाठा पुढे कोणाकडे पाठवला जाणार होता, त्याचा तपास अधिका-यांकडून सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे यांच्यासह एस. एस. गोंदकर, अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे, योगेश शेलार यांच्या पथकाने कारवाई केली.