नवे पारगाव : मानव कल्याणासाठी धर्माची निर्मिर्ती झाली. प्रत्येक धर्माची शिकवण व तत्त्वे ही लोककल्याणकारी आहेत. सध्या धर्माच्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम काही विघ्नसंतोषी व्यक्तिंकडून सुरू असून, अशा धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका निर्माण झाला आहे, असे मत ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू अवधुतानंद स्वामीजी तथा जगन्नाथ कुंटे यांनी व्यक्त केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अँग्रिकल्चर फार्ममध्ये प. पू. ह. भ. प. यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या ६३व्या स्मृतिदिनी आयोजित ‘नर्मदा परिक्रमा-अध्यात्म आणि संवाद’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.प्रारंभी अवधुतानंद स्वामीजी-जगन्नाथ कुंटे त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.स्वामीजी म्हणाले, चमत्कारापेक्षा कर्तृत्व मोठे असते. कर्तृत्वाने माणसं मोठी होतात, असे सांगून त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, कबीर यांच्या विचारांची अनेक उदाहरणे दिली. जातिभेद मानू नका, नामस्मरण करण्यास देवळात जावे लागत नाही, घरी बसूनही ते करता येते. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यांनाच गुरू माना व त्यांचे नामस्मरण करा. स्त्रियांवर जो अन्याय करतो, असा धर्म काय कामाचा. सद्गुरुपेक्षा सद्गुरू स्त्री ही खरी शक्ति आहे. तिलाच तुम्ही गुरू माना, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वेश कोरे, प्रतिमा पाटील, शांतीदेवी पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. साबळे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 11:18 PM