संतोष मिठारी - कोल्हापूर -शॉर्ट सर्किट अथवा अन्य कारणांमुळे आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी गोकुळ शिरगाव, शिरोली व शिवाजी उद्यमनगरमधील १ हजार ९०७ उद्योगांची भिस्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रांवरच आहे. सुरक्षेसाठी या औद्योगिक वसाहतींमध्ये अग्निशमन केंद्र व बंब असावा, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठपुरावा करून येथील उद्योजकीय संघटना थकल्या आहेत. औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात हे वास्तव पुढे आले. जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, पांजरपोळ, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित या औद्योगिक वसाहतींमध्ये २ हजार ५७ कारखाने आहेत. फौंड्री, आॅटोमोबाईल, मशीन शॉप, आदी उद्योगांचा त्यात समावेश आहे. यामध्ये एकत्रितपणे सुमारे ५२ हजार कामगार कार्यरत आहेत. व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य लेखापरीक्षण हा कायदा शासनाने केला आहे. उद्योग, कारखान्यांनी दर दोन वर्षांनी औद्योगिक सुरक्षेचे लेखापरीक्षण करणे सक्तीचे आहे. त्यानुसार उद्योजक ‘सिक्युरिटी आॅडिट’ करीत आहेत. मात्र, मोठी आग लागल्यास कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत वगळता शिवाजी उद्यमनगर, गोकुळ शिरगाव आणि शिरोली येथील वसाहतींमधील उद्योजकांना कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापुरातून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या बंबाला गरजेपेक्षा अधिक वेळ लागतो. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वरील औद्योगिक वसाहतींमध्ये स्वतंत्र असे अग्निशमन दल असणे गरजेचे आहे. त्याबाबतची मागणी आणि पाठपुरावा वारंवार कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (स्मॅक) ‘एमआयडीसी’कडे केला आहे. मात्र, त्याबाबत काहीच झालेले नाही. अग्निशमन केंद्र स्वत: चालविणे उद्योजकांच्या ‘बजेट’बाहेरचे आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे.दोन वर्षांत २० उद्योगांचे‘सिक्युरिटी आॅडिट’औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कोल्हापुरातील कार्यालयाच्या कक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. यामधील अपघात व धोक्यांचे प्रमाण अधिक असलेल्या अवघ्या वीस उद्योगांनी गेल्या दोन वर्षांत ‘सिक्युरिटी आॅडिट’ केले आहे. यात २०१३ मध्ये कोल्हापुरातील सात, रत्नागिरीतील दोन, सांगली तीन, तर २०१४ मध्ये कोल्हापुरातील दोन, रत्नागिरीतील सहा उद्योगांचा समावेश आहे. ‘सिक्युरिटी आॅडिट’बाबतचे हे वास्तव विचार करायला भाग पाडणारे आहे.५स्वतंत्र अग्निशमन दलाची गरज का?कागल पंचतारांकितमध्ये अग्निशमन दल आहे, तर शिवाजी उद्यमनगरमधील औद्योगिक वसाहत शहरात असल्याने याठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन दलाची मदत होते. मात्र, या तुलनेत गोकुळ शिरगाव, शिरोली या वसाहती शहरापासून १० ते १५ किलोमीटर दूर आहेत. आग लागलेल्या ठिकाणी कमीत कमी पाच मिनिटांत अग्निशमन दल पोहोचणे आवश्यक असते. पण, गोकुळ शिरगाव, शिरोली वसाहती दूर असल्याने याठिकाणी दलाला पोहोचण्यास साधारणत: अर्धा तास लागतो. त्यातून नुकसानीचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन दलाची गरज आहे.या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींत दोन, तर शिरोलीमधील एका उद्योगाला आग लागण्याचा प्रकार घडला. यात एकूण २० लाखांचे नुकसान झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. - आर. के. चिले (प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी, महानगरपालिका)शिरोली औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्रासाठी ‘एमआयडीसी’कडे पाठपुरावा केला. यावेळी त्यांच्याकडून ‘उद्योजकांनी हे केंद्र उभारून सांभाळावे,’ असे प्रत्युत्तर आले. असे केंद्र चालविणे या वसाहतीतील उद्योजकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. अशा स्वरूपातील ‘एमआयडीसी’चे दुर्लक्ष सुरक्षेला बाधा पोहोचविणारे आहे. - सुरेंद्र जैन (अध्यक्ष, स्मॅक)कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राचा गोकुळ शिरगावसाठी उपयोग होईल. शिरोली अग्निशमन केंद्राचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला आहे. त्याबाबत आमच्याकडूनदेखील पाठपुरावा सुरू आहे. - के. एस. भांडेकर, (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी)गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीत अधिकतर फौंड्री, मशीनशॉप आहेत. यातील कामगारांच्या सुरक्षेसाठी उद्योजक त्यांना आवश्यक साधने पुरवितात. मात्र, पूर्ण औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे अग्निशमन केंद्र कार्यरत असणे गरजेचे आहे. त्याबाबत ‘एमआयडीसी’कडे पाठपुरावा करून आम्ही थकलो आहोत.- उदय दुधाणे (अध्यक्ष, गोशिमा )अपघात टाळण्यासाठी प्रबोधन करण्यासह अपघात झालाच तर त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यरत आहे. औद्योगिक सुरक्षेबाबत कामगारांचे मेळावे, उद्योजकांना निवेदन करणे अशा पद्धतीने आम्ही प्रबोधन करतो. त्यातून चित्र बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.- हे. र. धेंड(प्रभारी सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय )सुरक्षेची नियमावली अशी...‘महाराष्ट्र राज्य आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना २००७’ या कायद्यानुसार प्रत्येक उद्योगाला त्याच्या क्षेत्रफळानुसार आगीपासून सुरक्षेची नियमावली निश्चित केली आहे.यात ५० चौरस मीटरसाठी अग्निशामक यंत्र, ५० ते १०० चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी अग्निशामक यंत्र, गुंडाळी, पाच हजार लिटर क्षमतेचा पाणीसाठा, १०० ते २०० चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी डाउन कम नळ, अग्निशामक यंत्र, साडेसात हजार लिटर क्षमतेचा पाणीसाठा आवश्यक आहे. औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी फोम टेंडर, फायर फायटर, प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या ‘अग्निशमन’वर भिस्त
By admin | Published: November 02, 2014 11:43 PM