आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0६ : शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी गेले सहा दिवस शेतकरी संपावर आहेत. सरकारच्या पातळीवर कोणतीच दखल घेतली जात नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी हस्तक्षेप करून युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांना ताब्यात घेतले. शेतकरी संपाचा हा सहावा दिवस आहे.
भाजीपाला, दुधासह इतर पदार्थांची आवक-जावक शेतकऱ्यांनी रोखल्याने पेच निर्माण झाला आहे. संपाच्या सहाव्या दिवशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय कार्यालयांना टाळे ठोक आंदोलन केले. युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
‘शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या सदाभाऊ शेट्टी व सरकार’च्या धिक्काराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर कार्यकर्ते एकदम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ धावले आणि टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत टाळे ठोकण्यास मज्जाव केला. तोपर्यंत माणिक शिंदे हे प्रवेशव्दारावर चढले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडीतून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.
शिंदेना ताब्यात घेतल्याने उर्वरित कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजीस सुरुवात केल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. यावेळी कार्यकर्ते मकरंद कुलकर्णी म्हणाले, पोलिसांच्या बळावर सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे; पण गाठ शेतकऱ्यांशी आहे.
यावेळी अजित पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब मिरजे, दादासो पाटील, गुणाजी शेलार, उत्तम पाटील, संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, एम. आय. सय्यद, आदी उपस्थित होते.
मंत्र्यांच्या घरावर धडक
गेले सहा दिवस श्ेतकरी आंदोलन करीत असताना असंवेदनशील सरकारला काहीच वाटत नाही. आता रस्त्यावरील लढाईबरोबरच मंत्र्यांच्या घरांवर चाल करणार आहे. बुधवारी जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले.