कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर नवीन वाशीनाक्याजवळ असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचे ‘एटीएम सेंटर’ चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. ‘एटीएम’मध्ये सुमारे सतरा लाख रुपये होते. ती रक्कम सुरक्षित असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचे नवीन वाशीनाका येथे ‘एटीएम सेंटर’आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास एका एसटीचालकाने जुना राजवाडा पोलिसांना फोन करून ‘एटीएम सेंटर’ फोडल्याची माहिती दिली. यावेळी जुना राजवाडा पोलिसांनी तत्काळ करवीर पोलिसांना वायरलेसवरून मॅसेज दिला. या दरम्यान पोलीस निरीक्षक ढोमे शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले होते. ते सहकार्यांसमवेत तत्काळ घटनास्थळी आले. एटीमच्या शटरचा दरवाजा अर्धवट झाकलेला होता. मशीनच्या समोरील सेलच्या पत्र्याचा दरवाजा कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. मशीनमध्ये नेमके किती पैसे आहेत, याची माहिती पोलिसांना नव्हती. एका कॉन्स्टेबलने आपल्या एटीएम कार्डावरून खात्यावरील शंभर रुपये काढले. पैसे बाहेर आल्यानंतर ते सुरू असल्याची खात्री झाली. त्यानंतर तत्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. काही वेळातच इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम प्रा. लि. मुंबई या कंपनीचे चॅनेल व्यवस्थापक प्रशांत प्रकाश तवंदकीर (वय ३०, रा. शाहूमिल कॉलनी, उचगाव) घटनास्थळी आले. त्यांनी मशीनची पाहणी केली असता रक्कम सुखरूप असल्याचे दिसले.
स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 14, 2015 1:51 AM