कोल्हापूर : महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर केलेले आरोप हे चुकीचे, बिनबुडाचे असून, प्रशासनाला बदनाम करणारे आहेत. चुकीचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी अधिकारी पैसे घेत असल्याचे पुरावे द्यावेत. मी त्यांच्यावर करवाई करतो, असे आव्हान आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले. घरफाळा आकारणीत कोणालाही सवलत दिलेली नाही. सर्व काही नियमांनुसारच केले गेल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. घरफाळा, आरोग्य, अग्निशमन, परवाना, पाणीपुरवठा, आदी विभागाने दिलेले करवाढीचे प्रस्ताव नगरसेवकांनी नाकारले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला काम करण्यास मर्यादा येतात, असे आयुक्तांनी सांगितले. आमच्यावर आरोप केल्यानंतरही आम्हाला आमचे मत मांडण्याची संधी दिली नाही. आम्ही आमची बाजू मांडत असताना सभागृहात गोंधळ घडवून आणला गेला. अधिकाऱ्यांवर असे तथ्यहिन आरोप करून दबाव आणणे अयोग्य आहे. प्रशासनाला बदनाम करण्याचे नगरसेवकांचे धोरण योग्य नाही, असे ते म्हणाले. राजारामपुरीतील मिळकतीचा घरफाळा कमी केला, सवलत दिली, असा जो आरोप केला तोही चुकीचा आहे. यासंदर्भात आधी माहिती घेतली असती तर असा आरोप झाला नसता. दोन वकिलांचे अभिप्राय घेऊनच त्या मिळकतधारकांवर आकारणी केली आहे. आमच्याकडून चुकीची आकारणी झाली होती, हे सुनावणीअंती स्पष्ट झाल्यानंतरच ५० लाखांची आकारणी कमी केली. ती सवलत नाही, असा खुलासाही आयुक्तांनी केला. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्याकडून मला अपेक्षित असलेले काम होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभागाचे काम आॅनलाईन करा म्हणून मी सांगत आहे, परंतु त्यांनी ते ऐकलेले नाही. त्यांच्या अनेक फायलींवर अपुरे शेरे असतात. त्यांच्या फायली मी तरी किती तपासणार? असा सवालही आयुक्तांनी उपस्थित केला.
प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 22, 2016 12:41 AM