कोल्हापूर ‘अॅस्टर आधार’ रुग्णालयाकडून अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय केणी यांनी दिली.
लसीकरणाचे महत्त्व आणि उपलब्ध असलेली लस याची माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. डॉ. दामले म्हणाले, ‘अॅस्टर आधार’कडे सध्या कोविशिल्ड ५०००, कोव्हॅक्सिन १० हजार आणि स्पुतनिक व्ही १००० उपलब्ध आहे. सध्या केवळ लसीकरण हाच आधार आहे. लस घेतली तरी कोविड होणारच नाही असे नाही. परंतु झाला तरी त्याची तीव्रता कमी असते आणि त्यामुळे जीवितहानी टाळणे शक्य होते, असे प्राथमिक अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
डॉ. अजय केणी म्हणाले, कोणती लस चांगली किंवा वाईट याची तुलना करण्यापेक्षा सध्याच्या स्थितीमध्ये मिळेल ती लस घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे. वृद्ध, मधुमेही, उच्च रक्तदाब, दमा, हृदयरोग किंवा अन्य आजार असणाऱ्यांनी तर प्राधान्याने लस घेण्याची गरज आहे. ‘अॅस्टर आधार’ मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये तीनही प्रकारच्या लस उपलब्ध आहेत.
आतापर्यंत या ठिकाणी साडेतेरा हजार जणांना लसीकरण करण्यात आले असून ज्या ठिकाणी १०० जणांचे लसीकरण आयोजित करण्यात आले, अशा ४२ सदनिका आणि व्यावसायिक कार्यालयांमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य असून कोवॅक्सिनवर नोंदणी करून आलेल्या सर्वांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना लसीकरणासाठी यायचे आहे त्यांनी लस असल्याची खात्री करूनच यावे, असेही आवाहन यावेळी डॉ. दामले आणि डाॅ. केणी यांनी केले.