कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोड आणि सुभाष रोड परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी मंगळवारी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच महापालिका इस्टेट विभागाचे पथक तेथे दाखल होत उघडलेली दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, लुगडीओळ परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीच्या दुकानदारास निर्बंध झुगारून दुकान उघडल्याने दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तू, सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यास शहरातील महाद्वार रोड, राजारामपुरी, गुजरी परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी उघडपणे विरोध केला. सोमवारी सकाळी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिका प्रशासन आणि त्यांच्यात काहीवेळ संघर्ष झाला. त्यानंतर दुपारी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. बैठकीत दोन दिवसांनंतर निर्बंध शिथिल करण्यासंंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले. यामुळे आक्रमक दुकानदारांनी संयम राखला. पण लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ दुकाने बंद असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. तयार कपडे, चप्पल, इलेक्ट्रिकल साहित्य विक्रीचे दुकानदार हतबल बनले आहेत. अपरिहार्यता म्हणून ते दुकाने उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण सरकारचे आदेश निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे असल्याने महापालिका प्रशासन सरसकट दुकाने सुरू करण्यास विरोध करीत आहे. मंगळवारी शहरात दोन ठिकाणी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप केला.
कोट
सरकारच्या आदेशानुसार सरसकट दुकाने सुरू करता येणार नाही. यामुळे महाद्वार रोड, सुभाष रोड परिसरातील दुकाने उघडण्यास विरोध केला.
सचिन जाधव, अधिकारी, इस्टेट विभाग