कोल्हापूर : भारताची ओळख पुसून आणि बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या पिढीच्या भाषेत भारताचा 'डीपी' बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. आपल्या नर्मविनोदी भाषणात त्यांनी या व्याख्यानात रंग भरताना भारत ही संकल्पनाच लोकशाही टिकवेल, म्हणून अजून आशा आहे, गांधी विचार लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.श्रमिक प्रतिष्ठान आयोजित 'लोकशाही वाचवा' या काॅम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेत 'प्रसार माध्यमांची स्वायत्तता' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी होते. अमृता जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय सुळगावे यांनी आभार मानले.आवटे म्हणाले, प्रसार माध्यमांना स्वत:चे स्वतंत्र अधिकार नाहीत. जे जनतेचे अधिकार तेच माध्यमांचे अधिकार आहेत. जागतिकीकरणामुळे अर्थकारण बदलले, तरीही खंडन-मंडणाची कल्पना याच देशाची आहे. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य याच घटनेने दिले आहे. माध्यमांनी लोकशाही बळकट करायची असते, परंतु आज लोकशाहीचे 'माध्यमी'करण तयार होत आहे, असे सांगत आवटे म्हणाले, भारताचा राष्ट्रवाद हे त्याचे वैशिष्ट्य आहे. वैविध्यता हे त्याचे बलस्थान आहे. ते नष्ट करण्याचा प्रयत्न 'एकचालुकानुवर्ती' नेतेपद लादून केले जात आहे, हे वेळीच ओळखले पाहिजे.भारताची ओळख अक्षय राहील. तो स्वत:ची माध्यमे स्वत: तयार करेल, असे आवटे म्हणाले. नव्या पिढीशी बोलले पाहिजे, त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. आजही सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे म्हणूनच त्याने बोलण्याचा अधिकार वापरला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.बुलककार्ट ते फ्लिपकार्टबुलक कार्टमधून इंटरनेटला विरोध करणारे आज फ्लिपकार्टवर आहेत. एटीएममधून पैसे यायचे हा चमत्कार पाहिला; पण आता मशीनमधून मते बाहेर येताहेत, हा चमत्कार पाहायला मिळतो आहे.
आजचे व्याख्यान :वक्ते : डॉ. हेमंत राजोपाध्ये, ठाणे.विषय : सनातन धर्म आणि आधुनिक समाज