इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीने घ्यावा व घेऊ नये, अशा दोन्ही एकमेकाविरोधी मागण्यांसाठी दोन विविध ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या दोघांच्या भांडणात गावाला मात्र गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. अशा परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी गायब झाले आहेत, तर स्थानिक नेत्यांनी हात वर केल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.कबनूर गावासाठी पिण्याचे पाणी शुद्धिकरण करून मिळावे म्हणून सन २०१० साली जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे रितसर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, राजकीय वरदहस्ताने नेत्यांनी प्रकल्प आपल्याच ताब्यात ठेवला. सहा वर्षांनंतर आता अध्यक्ष मनोहर मणेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपविला.मात्र, हा प्रकल्प नियमानुसार चालविण्यात आला नसून, यामध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप करीत कृष्णात गोते यांच्यासह सहाजणांनी सोमवारपासून कबनूर चौकात बेमुदत उपोषण सुरू केले. हा प्रकल्प ग्रामपंचायतीने वर्ग करून घेऊ नये; अन्यथा प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती पंचायतीला स्वखर्चाने करावी लागणार असून, यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटणार आहे. तसेच या प्रकल्पावर काम करणारे ३३ कर्मचारी आपण या योजनेवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पगारात काम करीत आहोत. त्यामुळे ही योजना सर्व कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून घ्यावी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचारी संघटनेद्वारे ग्रामपंचायतीसमोर मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.दोन्हीही बाजूने एकमेकाविरोधी भूमिकेसाठी उपोषण सुरू असून, प्रशासन यामध्ये कोणती भूमिका घेणार? व गावाला कधी पाणीपुरवठा होणार? या प्रश्नात ग्रामस्थ गुरफटले आहेत. (वार्ताहर) पाण्यासाठी तीव्र आंदोलनग्रामपंचायतीमध्ये सध्या मणेरे-पी. एम. पाटील गटाची सत्ता आहे. त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढून तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा गावातील काही संघटना व ग्रामस्थांच्यावतीने गाव बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास कबनूरमध्ये पाणी प्रश्नावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कबनूरच्या जलस्वराज्य प्रकल्पावरून ‘तू तू - मै मै’
By admin | Published: June 28, 2016 9:03 PM