कोल्हापूर : कोरोनाबरोबरच क्षयरोग निदान एकाचवेळी करण्यात येत असल्याने क्षयरोगाचे लवकर निदान होत आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे क्षयरोगाचा प्रसार कमी झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केले.
शाहू स्मारक भवनात जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नाव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, डॉ. फारूख देसाई, मानसी कदम, डॉ. विनायक भोई उपस्थित होते. यावेळी क्षयरोग नियंत्रणात आणल्याबद्दल केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिल्वर मेडल सर्टिफिकेशन प्रदान करून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, समाजामधील सर्व घटकांनी मिळून कोरोना-टी.बी.बद्दल जनआंदोलन उघडले, तरच या आजारावर आपण विजय मिळवू शकतो. आपल्याकडे शासकीय विभागात कोरोना-टी.बी.बद्दल अत्यंत उच्च दर्जाचे निदान तंत्रज्ञान मोफत उपलब्ध आहे. याचा लाभ सर्व लोकांनी करून घ्यावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, जिल्ह्यातील तालुके क्षयमुक्त तालुके म्हणून निवडलेले आहेत. ही क्षयमुक्त भारताकडे वाटचाल आहे. सर्व खासगी डॉक्टरांनी सर्व क्षयरुग्णांची नोंद निक्षयमध्ये करण्याचे आवाहन केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषाजी कुंभार यांनी प्रास्ताविक केले. नामदेव सावंत व नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल मडके यांनी ‘कोरोना व क्षयरोग परस्परसंबंध सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले.
--