इचलकरंजी : वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करणाऱ्या केंद्र सरकारच्या तांत्रिक उन्नयन योजने (टफ्स)तील अनुदान संबंधित स्वयंचलित मागधारकांच्या बॅँक खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेले दीड वर्ष इचलकरंजी शहर व परिसरातील विविध उद्योजकांचे रखडलेले सुमारे तीस कोटी रुपयांचे अनुदान बॅँकेत जमा होऊन त्याचा लाभ मिळेल. तसेच वस्त्रोद्योग आयुक्तांच्या पथकाकडून सध्या सर्वेक्षण सुरू असलेल्या स्वयंचलित मागधारकांनासुद्धा लवकरच अनुदान प्राप्त होईल, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.वस्त्रोद्योग हा मोठ्या प्रमाणावर सुलभ रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. केंद्र सरकारने सन २००१ पासून या उद्योगात असलेल्या उद्योजकांकडून त्यांच्याकडील यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जावर अनुदान देण्याची टफ्स योजना चालू केली. या योजनेंतर्गत इचलकरंजी व आसपास असलेल्या अनेक यंत्रमाग उद्योजकांनी स्वयंचलित (शटललेस) माग खरेदी करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केले. त्याप्रमाणे सन २०१३-१४ पर्यंत आलेल्या प्रस्तावांना अनुदान दिले जात होते. त्यानंतर मात्र बदललेल्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार अनुदानाचे अनेक प्रस्ताव वस्त्रोद्योग खात्याकडे प्रलंबित राहिले.स्वयंचलित मागांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे असे प्रकल्प बॅँकांचे कर्ज घेऊन यंत्रमाग उद्योगांनी उभारले होते. कर्जावर मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम बंद झाल्यामुळे अनेक उद्योजक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. बॅँकांकडे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी त्यांची आर्थिक कोंडी होऊ लागली. अशा उद्योजकांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे टफ्स योजनेंतर्गत स्वयंचलित मागांचे प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून घ्यावेत, अशी मागणी केली. म्हणून खासदार शेट्टी यांनी अशा उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन मार्च २०१६ मध्ये तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री संतोषकुमार गंगवाल यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मागधारकांची प्रकरणे विचारात घेऊन त्यांचा निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते. (प्रतिनिधी)
टफ्स योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा
By admin | Published: January 15, 2017 1:08 AM