प्रदीप शिंदेकोल्हापूर : निरोगी आरोग्यासाठी जो तो धडपडताना दिसतो. चांगल्या आरोग्यासाठी योगाचा कसा उपयोग होतो, हीच गोष्ट लोकांच्या मनात रुजविण्यासाठी शिवाजी विद्यापीठ व कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फे गेल्या चार वर्षांपासून योगाचे अखंडपणे मोफत मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठात सुरू असलेल्या या उपक्रमात एकदाही खंड पडलेला नाही, हे याचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
आजच्या गतिमान युगामुळे आपल्या जीवनशैलीतदेखील बदल होत आहे. कामाच्या धावपळीमुळे मानवाचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी लहान वयातच तरुणाई रोगाच्या विळख्यात सापडलीआहे. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हार्ट हृदयविकार, दमा, सांधेदुखी, थायरॉईड, किडनी विकार, इ. आजारांचे विकार जडत आहेत. व्यायामाकडे दुर्लक्ष, फास्ट फूड, अवेळी झोप, मानसिक ताणतणाव, नैराश्य, कामाचा दबाव यांमुळे या रोगांचा विळखा वाढत आहे. यावर आपला आहार आणि विहार हा एकमेव उपाय आहे.
नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ व सिद्धगिरी मठाने हा पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला. योगगुरू दत्ता पाटील आणि योगशिक्षक सूरज पाटील यांच्यामार्फत योगाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जाते. नियमित शिवाजी विद्यापीठात फिरण्यासाठी येणारे नागरिक याचा लाभ घेतातच; पण त्यासोबत विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. या उपक्रमाचा आजअखेर वीस हजारांहून अधिक जणांनी लाभ घेतला आहे.सकाळी सहा वाजता सुरुवातलोककला केंद्रामध्ये सहा वाजल्यापासून योगाच्या वर्गास प्रारंभ होतो. प्रथम ॐकार ध्यान, प्रार्थना, सर्वांगसुंदर व्यायाम, पवनमुक्तासनाचे काही प्रकार, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ध्यान हे नियमित घेतले जाते. तसेच सहा महिन्यांतून एकदा शुद्धिक्रिया घेतली जाते. हे सर्व मोफत शिकविले जाते. साडेसातपर्यंत मार्गदर्शन केले जाते.
सिद्धगिरी मठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्याद्वारे हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. सामान्य नागरिकांनाही योगविद्या शिकता यावी, फीअभावी योग शिकण्यामध्ये कोणताही खंड होऊ नये, या उद्देशाने मोफत मार्गदर्शन केले. आजअखेर वीस हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.- दत्ता पाटील, योगगुरू- चार वर्षांपासून अखंड उपक्रम- दीड तास वर्ग- वीस हजारांहून अधिक जणांना मार्गदर्शन- १५ वर्षांपासूनच्या मुला-मुलींसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग