कोल्हापूर : मुलीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी कोल्हापूरात आलेल्या सराफाचे कारमधील दहा किलो कच्ची चांदी, शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम असलेली बॅग असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल दोघा चोरट्यांनी लंपास केला.
मंगळवारी भरदूपारी बाराच्या सुमारास गजबजलेल्या माळकर तिकटी अवंती लॉजसमोर घडली. दोघेही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते तामिळनाडू-आंध्रप्रदेश येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.अधिक माहिती अशी, मुकूंद श्रीपती नाईक (वय ४८, रा. नवदूर्गा-तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हे सराफ व्यावसायीक आहेत. त्यांच्या मुलीच्या अभियांत्रिकेच्या प्रवेशासाठी ते कारमधून सोमवारी रात्री कोल्हापूरात आले होते. माळकर तिकटी येथील अवंती लॉजमध्ये उतरले होते.
मुलीच्या शैक्षणिक प्रवेशाचे काम करुन ते हुपरी (ता. हातकणंगले) येथे सोबत आणलेली दहा किलो कच्ची चांदी कारागिरांना देवून जाणार होते. त्यासाठी मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास लॉजमधील साहित्य घेवून ते खाली आहे.
पार्किंगमधील कारमध्ये साहित्य ठेवून ते पुन्हा लॉजमध्ये गेले. यावेळी त्यांचा चालक कारमध्ये बसून होता. त्याचेजवळ एक अज्ञात तरुण आला. त्याने ‘अंकल पैसा गिरा है’ असे हिंदीमध्ये म्हणत त्याचे लक्ष विचलीत केले.
यावेळी पाठिमागून त्याच्या दूसऱ्या साथीदाराने कारचा दरवाजा उघडून सिटवर ठेवलेली बॅग लंपास केली. काही वेळाने हा प्रकार चालकाच्या लक्षात आलेनंतर त्याने आजूबाजूला त्या दोघांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्याने मालक नाईक यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यांनी हाकेच्या अंतरावरील लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांची भेट घेवून तक्रार दिली. पोलीसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन अज्ञात परप्रांतिय तरुण बॅग चोरताना स्पष्ट दिसत आहेत. त्यावरुन त्यांचा शोध सुरु आहे.