कसबा बीड : वरुणराजाच्या विलंबामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण तसेच नदी पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद असल्याने नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत. तुळसी नदीने तळ गाठला आहे. दरम्यानच कसबा बीडमध्ये नदीपात्रात वीरगळ सापडली. सापडलेल्या या वीरगळावर फक्त शिवपुजेचा भाग असून त्यावर कोणतेही कोरीव काम आढळत नाही. गावात सापडलेल्या वीरगळांचा एकूण आकडा आता २०३ वर पोहोचला आहे.करवीर तालुक्यातील कसबा बीड हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी अख्यायिका आहे. याठिकाणी नेहमीच सुवर्ण मुद्रा सापडत असतात. इंग्लडच्या व्हिक्टोरिया राणीच्या काळातील चांदीची नाणी देखील काही दिवसापुर्वीच सापडली आहेत. वीरगळशिवाय इतरही अनेक अवशेष कसबा बीडमध्ये पहायला मिळतात.हे सर्व वीरगळ यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी यांनी कलेश्वर (बीडेश्वर -महादेव) मंदिरात विस्थापित केले आहेत. या वीरगळावरती अनेक देवी देवतांच्या कोरीव लेण्यासह, लढाईत शहीद झालेल्या मुख्य सेनापती, सरदार, सैनिक यांची त्याकाळातील अवशेष (क्षणचित्रे) कोरलेली आढळून येतात. यंग ब्रिगेड सुवर्णराजधानीचे संशोधक कार्यकर्ते सुरज तिबिले यांच्यासह अनेक तरुण एकत्र येऊन, 'ठेवा इतिहासाचा, ध्यास संवर्धनांचा' याला अनुसरून सामाजिक काम करत आहेत.
कोल्हापुरातील तुळसी नदीने तळ गाठला, कसबा बीडमध्ये नदीत वीरगळ सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 5:22 PM