कोल्हापूर : पन्नासपेक्षा जास्त मटका, जुगाराचे गुन्हे दाखल असलेला मटकाचालक विजय लहू पाटील (वय ५०, रा. देवकर पाणंद) याच्या मटक्याच्या कनेक्शनला गुरुवारी पोलिसांनी सुरुंग लावला. गोवा-महाराष्ट्रातील १६९ बुकीचालकांवर त्यांनी कारवाई केली. या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र लवकरच सादर केले जाणार आहे तसेच प्रत्येक एजंटाचा कबुलीजबाब घेऊन त्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती करवीरचे विभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शुक्रवारी दिली.
साधारण दीड महिन्यांपूर्वी इस्पुर्ली ते नागाव मार्गावर सुरेश बाळासो मगदूम यांच्या राहत्या घरामागील खोलीमध्ये एजंट अनिल चौगुले हा राजरोस मटका घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डॉ. अमृतकर यांच्या आदेशानुसार पथकाने छापा टाकून मटक्याच्या चिठ्ठ्या, रोकड, ३४ मोबाईल, सहा दुचाकी असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. या मटक्याचा बुकीमालक विजय पाटील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार इस्पुर्ली पोलिसांनी त्याच्यासह अनिल नागनाथ चौगले (३८, रा. क्रशर चौक), साजिद रफिक मोमीन (२४, रा. साने गुरुजी वसाहत), संदीप खंडेराव सावंत (४५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), किसन बाळासो डांगे (५७, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर), संभाजी राऊ सुतार (४०, रा. किरवे, ता. गगनबावडा), आदी १५ जणांना अटक केली होती.
संशयितांकडे मिळालेल्या मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती घेतली असता, संशयित विजय पाटील याचे महाराष्टÑ-गोवा कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी खोलवर तपास केला असता, गोव्यातील लोकांकडून मटक्यासाठी पैसा घेणारे १६९ एजंट निष्पन्न झाले. या सर्वांकडे चौकशी केली असता त्यांनी संशयित पाटील याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याची कबुली दिली.
आणखी काही एजंट निष्पन्न होण्याची शक्यता आहे. संशयित पाटील अनेक वर्षांपासून मटका व्यवसायात आहे. कारवाईचा त्याच्यावर कोणताच फरक पडत नसल्याने कारवाया करून पोलीसच हतबल झाले होते. त्याने महाराष्ट-गोव्यामध्ये बसविलेले कनेक्शनच पोलिसांनी उखडून टाकल्याने अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.मोक्का कारवाई होणारमटकाबुकी सलीम मुल्ला याच्यानंतर विजय पाटील याच्या कनेक्शनवर मोक्का कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मटक्यातील सर्वांत मोठी कारवाई कोल्हापूर पोलिसांनी केली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षकडॉ. अमृतकर यांनी दिली.