कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लाल पंखी होला या पक्ष्यांची नोंद 'बर्डस ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने रविवारी केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेचे आकर्षण ठरले.पक्षिगणनेत ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद झाली. यातील १६ प्रजाती या स्थलांतरीत पक्ष्यांच्या आहेत. जिल्ह्यातून ३0 पेक्षा जास्त पक्षीनिरीक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लाल पंखी होला हे या पक्षिगणनेचे आकर्षण ठरले.'बर्डस ऑफ कोल्हापूर' या ग्रुपमार्फत कोल्हापूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागात पक्षिगणना करण्यास प्रारंभ झाला आहे. या पक्षीगणनेतून जमा झालेली माहिती 'वेटलॉंड इंटरनॅशनल' या पर्यावरणीय संघटनेच्या 'इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस' मध्ये नोंद करण्यात येत आहे.कोल्हापूरात दर रविवारी विविध परिसरात ही पक्षिगणना होणार आहे. पुढील गणना दि. १0 जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६.४५ पासून राजाराम तलावावर केली जाणार आहे, अशी माहिती या ग्रुपचे समन्वयक प्रणव देसाई आणि सतपाल गंगलमाले यांनी दिली. या पक्षिगणनेमध्ये कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील, पक्षीनिरीक्षकांनी सहभाग नोंदवला.पक्षीतज्ञ आशिष कांबळे, ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झ्रालेल्या या पक्षिगणनेत बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, सत्पाल गंगलमाले, अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत आदी पक्षिनिरिक्षक सहभागी झाले होते.संकटग्रस्त प्रजातींचीही नोंदआययूसीएनने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तिरंदाज, नदी सुरय, काळ्या डोक्याचा शराटी या प्रजातीही या तलावावर आढळल्या. या तलावाकडे नाम्या हा रहिवासी पक्षी, तसेच स्थलांतरित बदक मात्र आढळून आले नाहीत.
अन्नसाखळीच्या टोकाला असणाऱ्या विविध पक्ष्यांची उपस्थिती असणं यातूनच कळंबा तलाव जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असल्याचे सिध्द करते आहे.- सतपाल गंगलमाले,समन्वयक, बर्डस ऑफ कोल्हापूर