कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक पार्कसह केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी. या उद्योगांचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडावे, अशी मागणी शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. शिवाय सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने देखील केली.आंदोलनकर्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास उद्योग भवन येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वावर पोहोचले. याठिकाणी त्यांनी ‘प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धिक्कार असो’, ‘ केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई झालीच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक अधिकारी होळकर यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो हायटेक पार्क आणि काही उद्योगांचे केमिकलयुक्त पाणी कसबा सांगाव येथील नागरी परिसरात सोडले जाते. ते पाणी नाले आणि कॅनॉलमधून थेटपणे नदीत मिसळते. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या उद्योगांचे वीज व पाणी कनेक्शन बंद करावे. शिवाय काही उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे आदेश देण्यात यावेत.आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, उपजिल्हा महिला संघटक विद्या गिरी, अशोक पाटील, चंद्रकांत भोसले, धनाजी पाटील, दिलीप सूर्यवंशी, अरुण शेटे, नितीन बागडी, राजू कुंभार, लखन माने, संदीप वागवेकर, सुरेश पाटील, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)कारवाई करणारउद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात साटेलोटे आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. कागलमधील राजकीय दबावाखाली ही कारवाई थांबविली जाते, असा आरोप आंदोलकांनी केला. कारवाई करणे तुम्हाला जमत नसल्यास आम्ही कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा देत उपप्रादेशिक अधिकारी होळकर यांना धारेवर धरले. त्यावर संबंधित घटकांवर ठोस कारवाई केली जाईल; तसेच संबंधित उद्योगांचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे लेखी आश्वासन देण्याचे होळकर यांनी मान्य केले.
प्रदूषण करणाऱ्या उद्योगांचे वीज, पाणी बंद करा
By admin | Published: May 19, 2015 11:45 PM