सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंधुदुर्गनगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेले कित्येक महिने बंद असल्याने येथील रहिवाशांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच ठिकठिकाणी फुटलेली पाईपलाईन आणि ड्रेनेजची गळती यामुळे पुरवठा होत असलेले पाणी म्हणजे रोगराईला निमंत्रण ठरत आहे.जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीला नवनगर प्राधिकरण नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. १९९४ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली ही नळयोजना पूर्णपणे जीर्ण झाली आहे. येथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेली कित्येक महिने बंद पडली आहे. पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली आहे, गंजून गेली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, जिल्हाधिकारी कर्मचारी वसाहत, पोलीस कर्मचारी वसाहत आणि शासकीय कार्यालये, जिल्हा रूग्णालय यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बंगल्यानाही या नळयोजनेच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, या योजनेकडे जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.जिल्हा मुख्यालयाची नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यावर २० वर्षे झाली. त्यावेळी ओरोस तलाव, पिठढवळ नदी आणि दाभाचीवाडी तलाव या तिन्ही बाजूने पाण्याचा पुरवठा होत होता. मात्र, कालांतराने ओरोस तलाव आणि पिठढवळ नदीकडील पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड होऊन ती कित्येक वर्षे बंद आहे. आता केवळ दाभाचीवाडी तलावातील पाणी पंपाद्वारे टाकीत चढवून या पाण्याचा थेट कर्मचारी वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. टाकीतून पुरवठा होणारे पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाच बंद असल्याने अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी फुटलेले ड्रेनेज, पाईपलाईन यामुळे घाणीचे पाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. पुरवठा होत असलेले पाणी पिवळ््या रंगाचे गढूळ असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दुरूस्तीच्या नावाखाली खोदून ठेवलेली पाईपलाईन गेले काही महिने उघडीच आहे. त्यामुळे डासांचाही फैलाव वाढला आहे. जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नळयोजनेची तत्काळ दुरूस्ती करावी. पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी. येथील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यादृष्टीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गनगरीत पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद
By admin | Published: October 28, 2014 10:40 PM