कोल्हापूर : अकरावीचे वर्ग सुरू होऊन आठवडा उलटत आला, तरी शहरातील काही महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवर अजूनही प्रवेशाची कार्यवाही सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे आतापर्यंत ६५४७ प्रवेशांची नोंद झाली आहे.शहरातील विविध ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या १३,४०० जागांसाठी यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यात निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. ७ जुलै, तर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत प्रवेशाची अखेरची संधी होती. यानंतर समितीच्या सूचनेनुसार ११ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू झाले. हे वर्ग सुरू होऊन आता आठवडा पूर्ण होत आला, तरी अजूनही शहरातील काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अपेक्षित महाविद्यालय मिळालेले नाही, असे विद्यार्थी त्यांना हव्या असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी धडपडत आहेत. निवड यादीप्रमाणे ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही त्यांच्या रिक्त जागेवर आपली वर्णी लावून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी काही विद्यार्थ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. यात विज्ञान शाखेच्या विनाअनुदानित तुकडीमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी झाली. आतापर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी झालेल्या एकूण ६५४७ प्रवेशांची समिती व शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे नोंद झाली आहे. यात निवड यादीनुसार आणि संस्था कोटातर्फे झालेल्या प्रवेशांचा समावेश आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठीदेखील अर्ज केले आहेत. याठिकाणी प्रवेश न मिळाल्यास वर्ष वाया जाऊ नये यासाठी अकरावी-बारावी करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांतील प्रवेश निश्चित केलेले नाहीत. विद्यार्थी हित लक्षात घेऊन काही महाविद्यालयेदेखील या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)अवघ्या आठ महाविद्यालयांची माहितीसमितीने निश्चित करून दिलेल्या प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत जितके प्रवेश झाले, याबाबतची माहिती समितीकडे ३२ पैकी अवघ्या आठ महाविद्यालयांनी दिली आहे. यात न्यू कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, महावीर महाविद्यालय, कमला महाविद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज, केएमसी कॉलेज, शहाजी महाविद्यालय यांचा समावेश आहे. अजूनही काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे त्यांच्याकडून प्रवेशाची आकडेवारी प्राप्त झालेली नाही. त्यांना प्रवेशाबाबतची माहिती समितीकडे सादर करण्यासाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिली असल्याचे शिक्षण उपसंचालक व समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले.समितीकडील नोंद प्रवेशकला : १०७५वाणिज्य : १९८३विज्ञान : २८१६संस्था कोटाअंतर्गत : ६४२
कॉलेज चालू, तरीही प्रवेश सुरूच
By admin | Published: July 15, 2016 11:42 PM