इचलकरंजी : दीपावली सणाच्या निमित्ताने येथील वस्त्रोद्योगातील कामगारांना दहा टक्क्यांपासून बावीस टक्क्यांपर्यंत बोनसचे वाटप करण्यात आले. त्यामुळे इचलकरंजी शहरातील बाजारामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुमारे साठ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेते व व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.शहरामध्ये सायझिंग-वार्पिंग, यंत्रमाग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा वस्त्रोद्योगातील घटक उद्योगांमध्ये कुशल व अकुशल कामगारांची संख्या सुमारे सात हजार आहे. यंत्रमाग कामगारांना तीस टक्के बोनस मिळावा, अशी मागणी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीने केली होती. तर शहरातील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी १६.६६ टक्के बोनस देण्यात यावा, असे आवाहन केले होते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात या उद्योगात असणारी आर्थिक मंदी आणि ५२ दिवस झालेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप याचेही सावट बोनसवर होते. तरीही थोड्या फार प्रमाणात सर्वच कारखान्यांमध्ये दहा टक्क्यांपासून कमाल बावीस टक्क्यांपर्यंत बोनस देण्यात आला, असे यंत्रमाग उद्योगातील उद्योजकांनी स्पष्ट केले.शुक्रवार (दि.६) पासून सोमवारअखेर विविध कारखान्यांमध्ये कामगारांचे हिशेब करून त्यांना बोनसची रक्कम देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील विविध प्रकारची कापडाची दुकाने, मिठाई, अल्पोपहार उत्पादनाची दुकाने, आकाशकंदील, पणत्या, मेणबत्त्या, तोरणे, कृत्रिम फुलांच्या माळा, इलेक्ट्रिक दुकानातील बल्बच्या माळा, तसेच अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी कामगारांनी सहकुटुंब बाजारात गर्दी केली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरामध्ये साठ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली असल्याचे विक्रेते-दुकानदार व व्यापारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विना संघर्ष, दिवाळी बोनसवस्त्रोद्योगातील मंदी आणि ५२ दिवसांचा संप याचा परिणाम कापड उत्पादनावर झाला असल्याची जाणीव कामगार आणि यंत्रमागधारक संघटनांना होती. परिणामी, यापूर्वी झालेल्या कराराप्रमाणे आणि त्याहून अधिक बोनस मिळावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. तर यंत्रमागधारकांच्या संघटनांनी करारापेक्षा अधिक पैसे देऊ नये, असे सांगितले असले तरी यंदाच्या दिवाळी सणापूर्वी कोणताही संघर्ष झाला नाही, हे चालूवर्षीच्या दिवाळीचे वैशिष्ट्य असल्याची चर्चा वस्त्रनगरीत होती.
साठ कोटींची उलाढाल
By admin | Published: November 10, 2015 11:11 PM