शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी (ता. १५) शिरोली बंदची हाक शुक्रवारी शिरोली हद्दवाढ कृती समितीने दिली आहे. हद्दवाढीच्या विरोधासाठी लोकप्रतिनिधींची शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात बैठक झाली. यावेळी हद्दवाढीच्या विरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी सरपंच बिसमिल्ला महात होत्या.यावेळी महेश चव्हाण म्हणाले, शिरोलीच्या विकासासाठी आम्ही समर्थ असून, भौगोलिक संलग्नतेच्या निकषावर हद्दवाढीस विरोध आहे. नगरपालिकेसाठी आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एमआयडीसीसह नगरपालिका मंजूर करण्यास भाग पाडू.भाजपचे सतीश पाटील म्हणाले, महापालिकेच्या हद्दीतील नवीन वसाहतीत सुविधांची वानवा आहे. महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत. कचरा प्रकल्पासाठी आरक्षित जागा कारभाऱ्यांनी आरक्षण उठवून गिळंकृत केल्या. असा ढिसाळ कारभार असलेल्या महापालिकेने आम्हाला विकासाचे स्वप्न दाखवू नये.रविवारी (दि. १४) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक यांना कृती समितीतर्फे निवेदन देण्यात येणार आहेत, तर सोमवारी (दि. १५) शिरोली बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता गावातून हद्दवाढीच्या विरोधात जनजागरण फेरी काढण्यात येणार आहे. यानंतर कृती समितीतर्फे महापालिकेचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर महामार्ग रोको, साखळी उपोषण, बेमुदत बंद असे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी सलिम महात, अनिल खवरे, बबन संकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कदम, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोरवी, शिवाजी समुद्रे, गोविंद घाटगे, हरी पुजारी, जयवंत स्वामी, आनंदा चौगुले, नितीन चव्हाण, डॉ. सुभाष पाटील, विजय चव्हाण, सुभाष चौगुले, राजाराम कपरे उपस्थित होते. आमची स्वतंत्र टाऊनशीपची मागणी आहे, शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र टाऊनशीपचा प्रस्ताव शासनाकडे आहे. नुकतीच सांगलीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टाऊनशीप मंजुरी दिली आहे, याच धर्तीवर आम्हाला ही टाऊनशीप मंजूर करून द्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - राजू पाटील, स्मॅक उपाध्यक्ष.शहरातील उद्यमनगराला आजपर्यंत सुविधा मिळालेल्या नाहीत आणि शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश करून कोणत्या सुविधा देणार, महापालिकेने नागरी वस्ती असलेल्या गावांचा समावेश हद्दवाढीत केला पाहिजे, औद्योगिक वसाहतीत नागरी वस्ती नसताना हद्दवाढ करायची गरजच काय? - कृष्णात पाटील, अॅग्रीकल्चर असोसिएशन, आयमाहद्दवाढ लादली, तर आम्हाला उद्योग विकून दुसरीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, उद्योगांना वीज दरात भरमसाठ वाढ, एलबीटी हद्दवाढीनंतर उद्योगांवर बसणारे विविध कर यामुळे उद्योग चालवणे शक्य होणार नाही, त्यापेक्षा विकून दुसरीकडे जाणे जास्त सोयीचे होईल. - सचिन पाटील, उद्योजक.लाटकरांचे विधान बालीशपणाचेशहरी व ग्रामीण भाग एकमेकाला पूरक आहेत. शहरात दळणवळण, शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळतात. ग्रामीण भागातून दूध व भाजीपाल्याच्या पुरवठा शहरात होतो. प्रत्येकाची अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सुविधा बंद करतो हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांचे विधान बालीशपणाचे आहे, असा टोला बाजीराव पाटील यांनी लगावला.
हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी शिरोली बंद
By admin | Published: June 13, 2015 12:47 AM