आजरा : गेल्या आठ वर्षांपासून आजरा तालुक्यात हैदोस घालणाऱ्या टस्कर हत्तीने धनगर मोळा परिसरात रविवारी दिवसा शेतकऱ्यांना दर्शन दिले.
गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर अचानक येऊन टस्कर चित्कारल्याने सर्वांची भंबेरी उडाली. सर्वांनी कापलेले गवत तेथेच टाकून गावाकडे धूम ठोकली.
सध्या गावात कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी राजा अवकाळी पावसाच्या भीतीने गवत कापणी लवकर आटोपण्याच्या मार्गावर आहे. टस्कर हत्तीच्या कळपाने गेली आठ वर्षे धनगर मोळा, सुळेरान, पारेवाडी, साळगाव, मसोली, हाळोली, गवसे, आल्याचीवाडी, देवर्डे, विटे, आवंडी, धनगरवाडा परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवसा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारून पिके उद्ध्वस्त करण्याचे काम टस्कर हत्तीचे सुरूच आहे.
ऊस, भात, नाचणा, नारळ, काजू, फणस यांचे झालेले नुकसान हत्तीच्या किमतीपेक्षा जास्त आहे.
धनगर मोळ्यातील बाळू शेटगे, ईश्वर जाधव, संजय शेटगे, एकनाथ खरूडे गवत कापणीसाठी शेतात गेले होते. चार वाजण्याच्या सुमारास टस्कर हत्ती चित्कारला. लगेच शेतकऱ्यांनी आरडाओरड केली व भीतीने कापलेले गवत तेथेच ठेवून ते गावाकडे आले. त्यानंतर टस्कर हत्तीने आपला मोर्चा बाळू शेटगे यांच्या उसाकडे वळविला. त्यांचे दोन एकरांतील अंदाजे ३० ते ४० हजारांचे नुकसान केले आहे.
---------------------------
भीतीने शेतीच्या कामावर निर्बंध
रात्रीऐवजी टस्कर हत्ती आता दिवसाच शेतकऱ्यांना दर्शन देत आहे. यापूर्वी हत्तीने फडकेवाडा धाब्याजवळ रस्त्यावर रात्रीचे अनेकांना दर्शन दिले होते, पण रविवारी गवत कापणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठ्याने चित्कारल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतीची कामे थांबली आहेत.
---------------------------
* फोटो ओळी : आजरा तालुक्यातील धनगर मोळा येथे दिवसा दर्शन दिलेला टस्कर हत्ती.
क्रमांक : ०६१२२०२०-गड-०६