आजरा तालुक्यात दोन टस्कर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एक तस्कर हत्ती मसोली, हाळोली, देवर्डे, वेळवट्टी परिसरात, तर दुसरा घाटकरवाडी, पारपोली, सुळेरान, गवसे या परिसरात आहे. भुदरगड तालुक्यातून रात्री आलेल्या टस्करने पारपोली येथील मारुती जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांचे ऊस, नाचना, भात तरवे यांचे नुकसान केले आहे. रचून ठेवलेल्या व वाळलेल्या गवताच्या गंजीही विस्कटून टाकल्या आहेत. मारुती जाधव यांची बैलगाडी मोडून शंभर फुटावर नेऊन फेकून दिली आहे. मसोली येथील धनाजी कुंभार व शशिकांत कुंभार यांच्या शेतातील नारळ, ऊस व भाताचे तरवे, तर सुरेश पटेकर व अर्जुन पटेकर यांच्या मानेचे शेत नावाच्या शेतातील भाताचे तरवे टस्कर हत्तीने खावून व तुडवून नुकसान केले आहे. टस्कर हत्तीकडून दैनंदिन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.
फोटो ओळी :
पारपोली (ता. आजरा) येथे मारुती जाधव यांची टस्कर हत्तीने मोडून टाकलेली बैलगाडी. दुसऱ्या छायाचित्रात मसोली (ता. आजरा) येथील धनाजी कुंभार यांच्या ऊस पिकात टस्कर हत्तीने घातलेला धुडगूस.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-१०/११