लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर : पेरणोली (ता. आजरा) येथील टस्कर हत्तीने बुधवारी रात्री अकरा वाजता वझरे (ता. आजरा) येथील गावालगत असणाऱ्या घराशेजारी येऊन ऊस, फणस, मेसकाठी या पिकांचे नुकसान केले. रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत हत्ती शेतातून फिरत होता. दोनवेळा हत्ती सुरेश खोत यांच्या रखवालीच्या खोपीत येऊन गेला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. अधिक माहिती अशी, रात्री अकराच्या सुमारास हत्ती बाळाराम घमे, सुरेश खोत, पांडुरंग गुरव, पांडुरंग खोत यांच्या उसाच्या शेतात हत्ती ऊस खात असल्याचे रखवालीला गेलेल्या शेतकऱ्यांना दिसला. हत्तीला पिटाळून लावण्यासाठी ते आवाज करू लागले. सुरेश खोत यांच्या शेतीतील ऊस खात हत्ती खोत यांच्या खोपीजवळ येऊन थांबला. यावेळी खोत हे खोपीतच होते.तेथून हत्ती मागे फिरला व समोरील बाळाराम घमे यांच्या घराजवळ गेला. घराशेजारी असणाऱ्या फणसाच्या झाडाचे फणस बारा फुटांपर्यंत खाऊन त्याने फस्त केले. तेवढ्यात वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ दोन वाजेपर्यंत जंगलात हत्तीला पिटाळून लावून परत आले. हत्ती पुन्हा खोत यांच्या शेताजवळ ऊस खाण्यासाठी पहाटे पाच वाजता आला असता पुन्हा खोपीजवळ आला. ते घाबरून गेले. खोपीजवळ हत्ती थोडावेळा थांबला. खोत यांनी हालचाल केली नाही. हत्ती पुन्हा शेतात गेल्यानंतर खोपीतून खोत हे शेजारील झाडावर चढून बसले. बॅटरीचा प्रकाश पडल्यानंतर ते आवाज करू लागले. त्यानंतर हत्ती अरळगुंडी व वझरे येथील जंगलाच्या दिशेने गेल्याचे खोत यांनी पाहिले. रात्री दोनपर्यंत श्रीकांत पाटकर, संजय घमे, दिलीप घमे, सुरेश खोत व वनविभागाचे वनपाल आर. एन. गवस व ग्रामस्थ हत्तीस हुकसकावून लावत होते. हत्तीचा मुक्काम वझरे, अरळगुंडी जंगलात असण्याची शक्यता आहे. नशीब बलवत्तर म्हणून बचावलो दोनदा हत्ती जवळ आला होता. हत्तीला पाहून घाबरगुंडी उडाली होती. जर खोप पाडली असती अन् हत्तीने हल्ला केला असता, तर आपण वाचलो नसतो. टस्कर हा फार मोठा आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपण बचावलो, अशी प्रतिक्रिया सुरेश खोत यांनी दिली. शेतातील रखवाली बंद महागोंड, वझरे येथील शेतकरी गव्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून शेतात रखवालीसाठी जातात. हत्तीने धुमाकूळ घातल्याने त्यांनी रात्रीची रखवाली बंद केली आहे.