कोल्हापूर : तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग राखत कोल्हापुरात बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गुणपत्रिका घेतल्या. त्यामुळे महाविद्यालयांचा परिसर काहीसा गजबजला. यंदा कोरोनामुळे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी या गुणपत्रिकांच्या वितरणाची कार्यवाही सुरू झाली.बारावीचा निकाल दि. १६ जुलैला जाहीर झाला. त्यानंतर साधारण: आठ दिवसांमध्ये गुणपत्रिकांचे वितरण होऊन पदवी अभ्यासक्रमाची पुढील कार्यवाही सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दि. २० जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. राज्यात एकूण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या गुणपत्रिकांचे वितरण लांबले.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून महाविद्यालयांना गुणपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गुणपत्रिकांचे वितरण केले. गर्दी टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी देखील मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले. सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत गुणपत्रिका वितरणाची प्रक्रिया सुरू राहिली. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये गटा-गटांनी प्रवेशाबाबतच्या गप्पा रंगल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत, काही पालकांसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आले होते.
मूळ गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.दहावीच्या गुणपत्रिकांनाही विलंब लागणारकोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आणि जिल्हाबंदी असल्याने दहावीच्या गुणपत्रिका वितरणाही थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे. ज्या वितरण केंद्रात कोविड कक्ष अथवा अलगीकरण कक्ष करण्यात आला आहे.
त्या परिसरात एका दिवसासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करून शाळांना गुणपत्रिकांचे वितरण करण्याचे नियोजन असल्याचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.