कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील वडणगे येथील गोसावी गल्लीत जागेच्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी करवीर पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण १२ जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, आज, बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अद्याप दोघे फरार आहेत.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : अमित मोहन गोसावी (वय २९), अर्जुन विठ्ठल गोसावी (४९), मोहन विठ्ठल गोसावी (५०), श्रीपती विठ्ठल गोसावी (५२), रमेश विठ्ठल गोसावी (४१), श्यामराव मोहन गोसावी (२३), तसेच विरोधी गटातील संपत सखाराम गोसावी, तुकाराम कृष्णा गोसावी, संजय तुकाराम गोसावी, (सर्व रा. गोसावी गल्ली, वडणगे, ता. करवीर).
या हाणामारी प्रकरणातील सर्व संशयित आरोपी एकाच गल्लीत राहतात. दोन कुटुंबांच्या घराजवळील दोन फुटाच्या बोळातून वहिवाटीच्या कारणावरून हा वाद सुरू होता. याच कारणावरून शनिवारी (दि. २७) रात्री पुन्हा वाद उफाळला. त्यावेळी दोन्हीही गट समोरासमोर आल्याने हाणामारीही झाली. दोन्ही गटाकडून दगड, काठ्या, बाटल्यांचा वापर झाला. दोन्हीही गटांनी केलेल्या हल्ला-प्रतिहल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. करवीर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी संपत गोसावी यांच्या गटाकडील पाचजणांना, तर मोहन गोसावी यांच्या गटाच्या सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी संशयित युवराज श्रीपती गोसावी व सागर श्रीपती गोसावी हे बंधू अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.