सांगरूळ : करवीर तालुक्यात अनेक गावांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू असताना बोलोली, उपवडेसह बारा वाड्यांमध्ये कोरोना महामारीच्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही. या गावांनी कोरोनाला वेशीच्या बाहेर रोखण्यात यश मिळवले आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोल्हापुरात दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असताना मात्र कोल्हापुरात रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये करवीर तालुकाही काही मागे नाही. तालुक्यात रोज २५० ते ३०० रुग्ण सापडत असून, आतापर्यंत १७ हजार ७०२ रुग्णसंख्या झाली आहे. मात्र, निसर्गाची देणगी लाभलेल्या व डाेंगरकपारात वसलेल्या वाड्यावस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
सांगरूळ, म्हारूळ, आमशी परिसरात काेरोनाचे रुग्ण अधिक असताना तुलनेत बोलोली, उपवडे, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, शिपेकरवाडी, कारंडेवाडी, दुर्गुळेवाडी, मठाचा धनगरवाडा, भेंडाईचा धनगरवाडा, मारुतीचा धनगरवाडा, न्हव्याची वाडी या गावांची सात ते आठ हजार लोकसंख्या असतानाही या गावांना कोरोना वेशीबाहेर रोखण्यात यश आले आहे.
याची केली काटेकोर अंमलबजावणी
मास्कचा शंभर टक्के वापर
शासकीय निर्बंधचे तंतोतंत पालन
लसीकरण
कोट-
छाेट्या-छोट्या वाड्यावस्त्या असल्यातरी येथे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन केले. ग्रामस्थांमध्ये जागृती झाल्याने कोरोना गावाबाहेर ठेवण्यात यश आले.
- सदाशिव बाटे, सरपंच, बोलोली