लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून, पंचगंगा नदीची पातळी २४.१ फुटांपर्यंत पोहोचली आहे. विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. करुळ घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक अद्याप बंदच आहे. कोकणातील वाहतूक भुईबावडामार्गे वळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात पाऊस चांगला सुरु आहे. उर्वरित तालुक्यात बुधवारी उघडझाप सुरु होती. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरणासह जोरदार सरी येत होत्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुुरु असून, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोदे धरणक्षेत्रात १७२, कुंभी १५० तर पाटगाव ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भुदरगड तालुक्यात सर्वाधिक २८.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातून विसर्ग कायम असून, राधानगरीतून प्रतिसेंकद १२००, दूधगंगेतून १०० तर वारणातून ७०० घनफूट पाणी नदीत येत आहे. त्याचबरोबर पाटगाव मधून ९६० तर कोदे लघु पाटबंधारेमधून ८५८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २४.१ फुटावर गेली असून, बारा बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, आजूबाजूच्या शिवारात घुसू लागले आहे. पावसाची रिपरिप सुरु असल्याने भात व नागलीच्या रोप लागणीला वेग आला आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी पंचगंगा नदीची पातळी २४ फुटांवर पोहोचली असून, यामध्ये तरुणांनी पोहण्याचा आनंद घेतला. (फाेटो-१४०७२०२१-कोल-रेन ) (छाया- आदित्य वेल्हाळ)