कोल्हापूर : शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात ४०० कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या साहायाने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात योगदान देत असून एरव्ही एका शिफ्टमध्ये चालणारे काम आता दोन शिफ्टमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे अखंड बारा तास करण्यात येत आहे.कोल्हापूर शहरातील महापुराची परिस्थिती आता सुधारत असून अनेक ठिकाणांचे पुराचे पाणी ओसरले आहे. आता पूरग्रस्त भागात केवळ दूषित पाण्याची डबकी, कुजलेला गाळ यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने आधी पुराच्या पाण्याचा सामना केला. आता शहर स्वच्छतेच्या आव्हानाचा सामना करत आहे.महापालिकेचे शहरात एकूण १२ आरोग्य विभाग असून त्यांच्या अखत्यारीत सुमारे दीड हजार कर्मचारी काम करत असतात. त्यातील ४०० कर्मचारी केवळ पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे जेसीबी, आवश्यक डंपर, काळ उचलणारे ट्रॅक्टर, जेट मशीन, औषध फवारणी पंप अशी यंत्रसामग्री देण्यात आली आहे.