उत्तूर : आमच्या घरात पती, सुना, मुले, नांतवडे, कोरोनाबाधित झाले. पती, मुलगा यांना मुकुंदराव आपटे फाउंडेशनमध्ये दाखल केले अन् माझ्या पायाखालची वाळू घसरली. सुना, नातवंडे व मीही गृहविलगीकरणात राहिले. मात्र, माझे ऑक्सिजन कमी झाले. त्यामुळे मी आपटे फाउंडेशनमध्ये दाखल झाले. २५ दिवसांनंतर मी कोरोनामुक्त झाले. माझ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे देवदतूच ठरले, असे भावनिक उद्गार उत्तूर (ता. आजरा) येथील आक्काताई तुरंबेकर (वय ६८) यांनी काढले.
आक्काताई या कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्या तेव्हा ८७ ऑक्सिजन लेव्हल होती. त्यांना तातडीने ऑक्सिजन लावण्यात येऊन उपचार करण्यात आले. दोन दिवसांनंतर एच.आर.सी.टी. करण्यात आल्यानंतर स्कोअर १९ आला. त्यामुळे प्रकृती चिंताजनक बनण्याचा धोका निर्माण झाला. सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना उमेश आपटे यांनी कोणतीही अडचण भासू दिली नाही.
दरम्यान, घरातील सर्व जण कोरोनामुक्त झाले. २५ दिवस कोविड सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय झाला. चांगल्या उपचारामुळे आपण कोरोनामुक्त झाल्याची भावना तुरंबेकर यांच्या मनात निर्माण झाली. कोविड सेंटरमधून घरी जाताना त्यांचे मन दाटून आले. त्या आपटे यांच्याकडे बघून धाय मोकलून रडत होत्या. साहेब, माझ्यासाठी देवदूत असल्याने मी बरी होऊन पती, मुले, सुना-नातवंडे यांच्यात रममाण होण्यासाठी घरी आले. परिवारातील सर्वांनी आक्काताई यांचे स्वागत केले. चार दिवसांनंतर उमेश आपटे, महेश करंबळी, संजय उत्तूरकर, किरण आमणगी यांनी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.
ते आले नसते तर...!
घरातील सर्व जण कोराेनाबाधित मुलगा, पती आपटे कोविड सेंटरमध्ये दाखल होते. आई गृहविलगीकरणात होती. आमचे नातेवाईक रवींद्र येसादे घरी आले होते. त्यांनी ऑक्सिजन लेव्हल तपासली. ती ८७ होती. त्यांनी लगेच उमेश आपटे यांना माहिती दिली. क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका आली अन् आईला दाखल केले. ते आले नसते अन् वेळेत उपचार झाले नसते, तर कदाचित अनर्थ घडला असता.
- संजय तुरंबेकर
फोटो ओळी : कोरोनामुक्तीनंतर उतूर (ता. आजरा) येथे आक्काताई तुरंबेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे.
क्रमांक : २५०६२०२१-गड-०८